चोरट्यांच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी
By Admin | Updated: May 8, 2014 12:45 IST2014-05-08T12:45:08+5:302014-05-08T12:45:08+5:30
सावंतवाडीतील घटना : एका रात्रीत चार बंद घरे फोडली

चोरट्यांच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी
सावंतवाडी : शहरात चोरीचे सत्र थांबण्याची चिन्हे नसून मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी शहरातील चार बंद घरे फोडली. सालर्ईवाडा येथील पॉल फर्नांडिस यांचे बंद घर फोडताना शेजारी राहणार्या भाडेकरुंना त्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. परंतु माडाचा पिडा, विटा, काठ्यांचा मारा करीत चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले. चोरट्यांच्या हल्ल्यात नगरपालिकेचे कर्मचारी अजीज पापा बेग व त्यांची पत्नी दिलशाद बेग या जखमी झाल्या. त्यांच्या मुलालाही किरकोळ दुखापत झालीे. सावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री शहरातील चार बंद घरे चोरट्यांनी फोडली. यामध्ये वसंत अनंत कानविंदे, दिनेश शंकर गावडे, महेश लक्ष्मण घाडी यांच्या घरांचा समावेश आहे. दिनेश गावडे यांच्या घरातील कपाट फोडून आतील सोन्याची चेन, अंगठी व ७५०० रुपये असा अंदाजे लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे. चार बंद घरे फोडल्यानंतर चोरट्यांनी सालईवाडा भागाकडे मोर्चा वळविला. तेथील पॉल फर्नांडिस हे कामानिमित्त वास्को येथे राहत असल्याने त्यांचे घर बंदावस्थेत असते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात घुसून सर्वत्र शोधाशोध सुरू केली. तेथील कपाटे वगैरे फोडत असताना शेजारी भाड्याने राहणारे पालिकेचे कर्मचारी अजीज बेग यांच्या परिवाराला याची कुणकुण लागली. त्यांची पत्नी दिलशाद बेग यांनी बाहेर येऊन पाहिले असता सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच याची कल्पना अजीज बेग यांना दिली. एव्हाना आरडाओरडीने सावध झालेल्या चोरट्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. बेग कुटुंबियांनी त्यांना प्रतिकार केला. परंतु चोरट्यांनी हातात मिळेल त्या वस्तू त्यांच्या दिशेने भिरकावून त्यांना जखमी केले व तेथून पलायन केले. चोरट्यांच्या हल्ल्यात अजीज बेग यांच्या हाताला व मणक्याला, तर दिलशाद बेग यांच्या हात व पायांना दुखापत झाली.