आजीसह नातवाचा ‘कृष्णे’त बुडून मृत्यू
By Admin | Updated: May 10, 2015 01:11 IST2015-05-10T01:11:00+5:302015-05-10T01:11:00+5:30
अर्जुनवाड येथील घटना : नातवाला वाचविताना काळाचा घाला

आजीसह नातवाचा ‘कृष्णे’त बुडून मृत्यू
शिरोळ : कृष्णा नदीत पाण्यात बुडणाऱ्या नातवाला वाचविताना आजीचाही बुडून मृत्यू झाला. अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. काशीबाई जगन्नाथ डोंगरे (वय ५५, रा. अर्जुनवाड) व वैभव शिवाजी शेळके (१०, रा. बेडग, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चौथीची परीक्षा दिल्यानंतर उन्हाळी सुटी असल्याने बेडग येथील वैभव हा अर्जुनवाड येथे मामाकडे आला होता. शनिवारी दुपारी आजी काशीबाई डोंगरे जनावरे धुण्यासाठी कृष्णा नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत वैभवही होता. नदीत पोहत असताना अचानक वैभव पाण्यात बुडू लागला. आजीच्या निदर्शनास येताच त्यांनी पाण्यात धाव घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने नातवाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याही बुडाल्या.
ही घटना पुलावरून जाणाऱ्या भरत येवारे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी नदीपात्रात बुडणाऱ्या काशीबाई डोंगरे यांना पाण्यातून बाहेर काढले. वैभवलाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पाण्यात बुडाला. खासगी वाहनातून उपचारासाठी मिरज सिव्हील रुग्णालयात नेत असतानाच काशीबाई यांचा मृत्यू झाला. अर्जुनवाडमधील तरुणांनी वैभवचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनास्थळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काशीबाई डोंगरे यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना असा परिवार आहे, तर वैभवच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)