दत्तवाडचे ग्रामीण रुग्णालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’
By Admin | Updated: November 14, 2014 23:33 IST2014-11-14T23:29:01+5:302014-11-14T23:33:19+5:30
रुग्णांची हेळसांड : जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर रुग्णांच्या आशा पल्लवीत

दत्तवाडचे ग्रामीण रुग्णालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’
गणपती कोळी -- कुरूंदवाड --दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामीण रुग्णालय दत्तवाडसह परिसरातील सुमारे पंचवीसहून अधिक गावांतील रुग्णांना आधार बनले आहे. मात्र, आरोग्य विभागातील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा, उपचारास टाळाटाळ, औषधांचा तुटवडा, आदी कारणांमुळे रुग्णांची हेळसांड होत असून, सर्वसोयींनीयुक्त असणारे रुग्णालय रुग्णांसाठी मात्र ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी या रुग्णालयाला अचानक भेट देऊन वस्तुस्थिती पाहून गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुलभ सेवा मिळावी, या उद्देशाने शिरोळ तालुक्यात शिरोळ व दत्तवाड या दोन गावांमध्ये सर्वसोयी असलेले ग्रामीण रुग्णालय उभारले. १९८१ पासून तीस खाटांची सेवा देणारे जिल्ह्यातील हे पहिलेच रुग्णालय आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात परिसरातील सुमारे पंचवीसहून अधिक गावांतील रुग्ण सेवा घेतात. औषधे, प्रयोगशाळा (रक्त, लघवी तपासणी), आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधे, दंत चिकित्सा विभाग, नेत्र विभाग, सोनोग्राफी, आॅपरेशन थिएटर अशा सर्व विभागांची स्वतंत्र कार्यालये असलेले टोलेजंग रुग्णालय आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, लिपिक असे कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेविका, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, सहायक, अशी पदे रिक्त आहेत. सेवेत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असला तरी रुग्णालय अधीक्षक डॉ. जाधव यांच्या वारंवार असणाऱ्या अनुपस्थितीमुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे बेशिस्तपणा वाढतच गेला. या सुविधांकडे आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने औषधांचा तुटवडा, सेवेत असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्यामुळे जबाबदारी टाळणे यामुळे रुग्णांची हेळसांडच होत आहे. वैद्यकीय अधिकारी, तसेच दिली जाणारी सेवा याबाबत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख बाळासो कोकणे यांनी आंदोलन करून लक्ष वेधले, तरी याची गंभीर दखल घेतलीच नाही. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे. ग्रामस्थ, आंदोलनकर्ते यांच्या वारंवार तक्रारींमुळे जिल्हाधिकारी माने यांनी अचानक रुग्णालयाला भेट दिल्याने वस्तुस्थिती स्पष्ट झाली. रुग्णालयातील अवस्था पाहून जिल्हाधिकारी माने यांनी तहसीलदार सचिन गिरी यांना अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.