ऊसदरात ‘दत्त’, ‘जवाहर’च भारी

By Admin | Updated: June 28, 2014 00:48 IST2014-06-28T00:43:04+5:302014-06-28T00:48:14+5:30

यंदा शेतकऱ्यांना दिलासा : ‘एफआरपी’पेक्षा दीडशे रुपये जादा दर

'Datta', 'Jawahar' is very heavy in Ushadrat | ऊसदरात ‘दत्त’, ‘जवाहर’च भारी

ऊसदरात ‘दत्त’, ‘जवाहर’च भारी

 कोल्हापूर : हुतात्मा साखर कारखान्याने राज्यात उच्चांकी दर दिला असला तरी हा दर ‘एफआरपी’प्रमाणेच दिला आहे. परंतु, दत्त-शिरोळ व जवाहर-हुपरी या कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा १५० ते २०० रुपये जादा दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. गेल्या गळीत हंगामात साखरेचे घसरलेले दर व ‘एफआरपी’ याचा ताळमेळ घालताना साखर कारखानदारांची पुरती दमछाक झाली होती. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची ‘एफआरपी’ २२५० ते २५६९ रुपयांपर्यंत होती. पहिल्या उचलीत एवढी रक्कम देणे शक्य होणार नाही, असे कारखानदारांचे म्हणणे होते; पण कारवाईच्या बडग्याने ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागले. हे पैसे शेतकऱ्यांना देणे कारखानदारांच्या आवाक्याबाहेर होते; पण केंद्र शासनाने ६६०० कोटींचे पॅकेज कारखान्यांना दिल्याने ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे शक्य झाले. ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना दिलेल्या उचलीमध्ये विभागातच नव्हे, संपूर्ण राज्यात सर्वाधिक दर हा हुतात्मा साखर कारखाना, वाळवा यांनी २५७१ रुपये प्रतिटन दिला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर देत ‘हुतात्मा’ने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. याचबरोबर या कारखान्याचे धोरण शेतकरी हिताचे असते, याबाबत दुमत नाही; पण या कारखान्याची ‘एफआरपी’ २५६९ रुपये निघत होती. त्यामुळे ‘हुतात्मा’ला एवढी उचल देणे कायद्याने बंधनकारक होते. या तुलनेत दत्त-शिरोळने शेतकऱ्यांना प्रतिटन १५० रुपयेप्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे. त्यांची ‘एफआरपी’ २२९२ रुपये निघत असतानाही त्यांनी आतापर्यंत २४५० रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. जवाहर-हुपरीची ‘एफआरपी’ २२७० रुपये आहे. त्यांनी २३०० रुपये पहिली उचल दिली आहे. आता २०० रुपयांपर्यंत दुसरा हप्ता काढला आहे. त्यामुळे विभागात ‘एफआरपी’पेक्षा जादा दर देण्यात ‘दत्त’ व ‘जवाहर’ भारी पडले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Datta', 'Jawahar' is very heavy in Ushadrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.