दत्तभक्तांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:04 IST2017-07-18T23:04:41+5:302017-07-18T23:04:59+5:30
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी : कृष्णा व पंचगंगा या दोन पवित्र नद्यांची पाणीपातळी कमी-जास्त होतेय

दत्तभक्तांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा !
प्रशांत कोडणीकर । लोकमत न्यूज नेटवर्क
नृसिंहवाडी : पावसाने वेळाने केलेले आगमन व अनियमितपणामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन पवित्र नद्यांची पाणीपातळी कमी-जास्त होत आहे. श्रावण पौर्णिमा जवळ येऊनही येथील दत्त मंदिरापर्यंत नद्यांची पाणीपातळी न पोहोचल्याने असंख्य दत्तभक्त व ग्रामस्थांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नृसिंहवाडी येथे सध्या कन्यागत पर्वकाल चालू असून, दक्षिणद्वार व पर्वकाल योगावर दक्षिणद्वार येथे स्नान करण्यासाठी भक्त पावसाची वाट पाहत आहेत.
सर्वसाधारणपणे आषाढी अखेरीस किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीस येथील दत्त मंदिरात पाणीपातळी वाढल्याने दक्षिणद्वार सोहळा होतो. या सोहळ्यात मंदिराच्या दक्षिण बाजूच्या दरवाजात स्नान करण्यासाठी इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर, उगार, चिकोडी, बेळगाव यांसह अनेक ठिकाणांहून भाविक हजेरी लावतात. अजूनही मंदिरात कृष्णा नदीचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे असंख्य भाविक दक्षिणद्वार सोहळ्याकडे टक लावून बसले आहेत.
येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून, समोर वाहणारी कृष्णा नदी दक्षिण दिशेकडे वाहते. सातारा, कऱ्हाड, सांगली, गगनबावडा, राधानगरी, कोल्हापूर, आदी ठिकाणांचे सर्व पाणी नृसिंहवाडीकडे येत असल्याने येथील पाणीपातळी पावसाळ्यात झपाट्याने वाढते व नदीचे पाणी वाढल्याने ते लवकरच येथील दत्त मंदिरापर्यंत पोहोचते. दक्षिणद्वार सोहळ्यावेळी मंदिराच्या उत्तरद्वारातून शिरलेले कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या मनोहर चरणकमलाला स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात. यावेळी दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे म्हणजेच पुण्यकारक मानले जाते. या सोहळ्यात स्नान केल्याने मानवांच्या पापांचा ऱ्हास होऊन पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.