दसरा कप ‘दिलबहार’कडे

By Admin | Updated: April 2, 2015 01:25 IST2015-04-02T01:15:55+5:302015-04-02T01:25:39+5:30

करण चव्हाण-बंदरेची हॅट्ट्रिक : अंतिम सामन्यात ‘फुलेवाडी’चा उडविला ६-१ ने धुव्वा

Dashera Cup 'Dilbahar' | दसरा कप ‘दिलबहार’कडे

दसरा कप ‘दिलबहार’कडे

कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळ (अ)ने फुलेवाडी क्रीडा मंडळाचा ६-१ असा धुव्वा उडवीत दसरा कप फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. ‘दिलबहार’च्या करण चव्हाण-बंदरेची हॅट्ट्रिक लक्षणीय ठरली.शाहू स्टेडियम येथे दिलबहार (अ) व फुलेवाडी संघ यांच्यात अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार (अ)च्या करण चव्हाण-बंदरे, सचिन पाटील, जावेद जमादार, सनी सणगर, गणेश दाते यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत फुलेवाडी संघावर दबाव निर्माण केला. २६व्या मिनिटास फ्री किकवर अनिकेत जाधवने फटका मारला. हा फटका गोलपोस्टला अडून आत आला. ही संधी साधत गणेश दातेने गोल नोंदवीत १-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘फुलेवाडी’कडून सुशांत अतिग्रे, सूरज शिंगटे, दिग्विजय वाडेकर, मंगेश दिवसे, संकेत वेसणेकर यांनी खोलवर चढाया केल्या. मात्र, ‘दिलबहार’च्या बचावफळीपुढे त्यांचे काहीच चालले नाही. ३२ व्या मिनिटास ‘दिलबहार’च्या सनी सणगरने मैदानी गोल नोंदवीत २-० अशी आघाडी वाढविली. ‘फुलेवाडी’कडून तेजस जाधव, मोहित मंडलिक, संकेत वेसणेकर, अजित पोवार यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.
उत्तरार्धात दिलबहार (अ)च्या संघातील खेळाडूंनी आक्रमक व वेगवान चाली रचण्यास सुरुवात केली. तितक्याच वेगाने फुलेवाडी संघानेही प्रतिकार केला. मात्र, अचूक पास व समन्वय यांमुळे ‘दिलबहार’च्या करण चव्हाण-बंदरेने सचिन पाटीलच्या साथीने अनुक्रमे ४६, ६१ आणि ८० व्या मिनिटास सलग तीन गोल नोंदवीत हॅट्ट्रिक साधली. ४८व्या मिनिटास जावेद जमादारच्या पासवर सनी सणगरने मारलेला फटका परतावून लावताना ‘फुलेवाडी’च्या दिग्विजय वाडेकरकडून स्वयंगोल झाला; तर ‘फुलेवाडी’कडून ८३ व्या मिनिटास अजित पोवार याने हेडद्वारे गोल केला. यामुळे सामन्यात आघाडी एक गोलने कमी झाली. सामन्यात फुलेवाडीच्या गोलरक्षकाने ‘डी’बाहेर येत चेंडू हाताळला याबद्दल मुख्य पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर काढले. अखेर सामना दिलबहार (अ) ने ६-१ असा जिंकत दसरा चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या दिलबहार (अ) संघास ३१ हजार, तर उपविजेत्या फुलेवाडी संघास २१ हजारांचे बक्षीस व दसरा चषक के.एस.ए.चे चीफ पेट्रन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, युवराज संभाजीराजे, के.एस.ए.चे अध्यक्ष दि. के. अतितकर, मानसिंग जाधव, अरुण नरके, माणिक मंडलिक, पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, राजेंद्र दळवी, विजय साळोखे, मनोज जाधव, संभाजी पाटील-मांगोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

स्पर्धेला हुल्लडबाजीने ग्रासले
स्टेडियममध्ये के.एस.ए.ने हुल्लडबाजांना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तरीही संपूर्ण दसरा चषक स्पर्धेत टेंबे रोडकडील प्रेक्षक गॅलरीत काही ना काही कारणांनी समर्थकांत हाणामारी झाली. अंतिम सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांतही याच गॅलरीतून समर्थकांत जोरदार हाणामारीचा प्रकार झाला. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या प्रेक्षकास पोलिसांनी बाहेर नेले; तर एका दहावर्षीय मुलाने या गोंधळात गॅलरीतून थेट स्टेडियममध्ये उडी मारली. सुदैवाने त्याला किरकोळ दुखापत झाली. संपूर्ण स्पर्धा काही खेळाडू आणि समर्थक यांच्या बेशिस्त वर्तनाने गाजली.



स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू (सर्व दिलबहार)
बेस्ट स्ट्रायकर - सनी सणगर बेस्ट हाफ - करण चव्हाण-बंदरे
बेस्ट डिफेन्स - प्रतीक व्हनाळीकर बेस्ट गोलकीपर - शोएब शेख

Web Title: Dashera Cup 'Dilbahar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.