कोरोचीत गव्याचे दर्शन, पावलांचे ठसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:54+5:302021-01-08T05:21:54+5:30
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे एका शेतामध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजता गव्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळताच ...

कोरोचीत गव्याचे दर्शन, पावलांचे ठसे
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे एका शेतामध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजता गव्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी गव्याच्या पावलांचे ठसे आढळले. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोचीतील चावरे मळा या परिसरातील शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला गवा असल्याचे आढळून आले. त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करताच गवा जवळच असणारे तारेचे कंपाउंड तोडून धूम ठोकत उसाच्या फडात शिरला. दरम्यान, शेतकऱ्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला असता, गवा त्यांच्या दिशेने येताच तेथून शेतकऱ्यांनी काढता पाय घेतला. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिली. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, तलाठी अनंत दांडेकर, पोलीसपाटील सावकार हेगडे, ग्रामविकास अधिकारी राजू जाधव, माजी सरपंच अभिनंदन पाटील, आदींनी भेट देऊन पाहणी केली.
(फोटो ओळी)
०५०१२०२१-आयसीएच-०१
कोरोची (ता. हातकणंगले) येथे गव्याच्या पावलांचे ठसे आढळले.