‘रमजान’मध्ये सर्व धर्मीयांच्या सलोख्याचे दर्शन
By Admin | Updated: July 14, 2015 19:49 IST2015-07-14T19:49:27+5:302015-07-14T19:49:27+5:30
गडहिंग्लजला २० मस्जिदी : सामाजिक ऐक्य अबाधित, सर्व धर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन

‘रमजान’मध्ये सर्व धर्मीयांच्या सलोख्याचे दर्शन
राम मगदूम- गडहिंग्लज --लोकसंख्येच्या तुलनेत अन्य धर्मीयांपेक्षा अत्यल्प संख्या असली तरी गडहिंग्लज तालुक्यात मुस्लिम बांधव आणि अन्य धर्मीयांतील सामाजिक ऐक्य अनेक वर्षांपासून अबाधित आहे. सर्व सणांत
सर्व धर्मीयांचा उत्साही सहभाग असतो. अनेक मुस्लिम बांधव नवरात्रीचे उपवास करतात, तर अनेक हिंदू बांधव रमजानचे रोजे करतात. त्यामुळे येथील ‘रमजान’मध्ये सर्व धर्मीयांच्या सलोख्याचे दर्शन घडते.
गडहिंग्लज शहरात तीन, तर तालुक्यात मिळून २० मस्जिदी आहेत. पवित्र रमजाननिमित्त सर्व मस्जिदीमध्ये नमाज, तरावीह पठण, रोजा, इफ्तार, आदी धार्मिक विधी होत आहेत. गडहिंग्लजसह नेसरी व हलकर्णी येथे सर्व धर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते.
गडहिंग्लज शहरातील संकेश्वर रोडवरील सुन्नी जुम्मा मस्जिद ही सर्वांत जुनी मस्जिद आहे. याशिवाय हुजरे गल्लीत मरकज मस्जिद, तर मेटांच्या मार्गनजीक मदिना मस्जिद आहे. यापैकी केवळ मरकज मस्जिदीतच तबलीग जमातीचे कार्य चालते. मात्र, सर्व धर्मीयांच्या लोकवर्गणीतूनच ही मस्जिद बांधण्यात आली आहे, हे या मस्जिदीचे वैशिष्ट्य आहे. सुन्नी जुम्मा मस्जिदीचा जीर्णोद्धार तत्कालीन जिम्मेदार मन्सूरभाई मुल्ला यांनी केला. प्रशस्त मस्जिदीसह वजूखाना व स्वच्छतागृहाची सोय केली. नुकतेच मस्जिदीच्या परिसरात काही दुकानगाळे काढून त्यांनी मस्जिदीच्या देखभाल दुरुस्तीची आर्थिक
व्यवस्था करून ठेवली आहे. सर्वसोयींनीयुक्त व आदर्श मस्जिद म्हणून ओळखली जाणारी मरकज मस्जिदचे व्यवस्थापक घुडुसाब शेख, सेक्रेटरी हारुण सय्यद व सहकाऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधली आहे. या मस्जिदीची शाखा म्हणजेच मदिना मस्जिद होय. मुश्ताक खलिफा हे या मस्जिदीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.
हसूरचंपू, नूल-हलकर्णी, खणदाळ, बसर्गे, निलजी, करंबळी, डोणेवाडी, गिजवणे, महागाव, ऐनापूर, नेसरी, कडगाव व वडगाव या ठिकाणीही मस्जिदी आहेत.
‘एतिकाफ’साठी मस्जिदीत मुक्काम
महिना रमजानचा
सामाजिक सलोख्याचा !
सध्या रमजानमधील शेवटच्या टप्यात येणारा एतिकाफ हा धार्मिक विधी सुरू आहे. या कालावधीत येणारी ‘शब-ए-कद्र’ ही रात्र पवित्र रात्र मानली जाते. या रात्रीच्या उपासनेला इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे एतिकाफसाठी सर्व मस्जिदींमध्ये काही मुस्लिम बांधव मुक्कामास आहेत. त्यांच्याकडून अल्लाहाची इबादतसह समस्त मानव समाजासाठी दुआ (प्रार्थना) मागितली जाते.