‘जीवनदायी’त लुटणाऱ्या रुग्णालयांना दणका
By Admin | Updated: June 1, 2015 00:16 IST2015-06-01T00:09:43+5:302015-06-01T00:16:22+5:30
शासनाची कारवाई : ५३ रुग्णांना केले साडेतीन लाख रुपये परत

‘जीवनदायी’त लुटणाऱ्या रुग्णालयांना दणका
गणेश शिंदे - कोल्हापूर केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांकडून पॅकेजपेक्षा जादा पैसे उकळलेले जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. गेल्या दीड वर्षात ज्या रुग्णांचे जादा पैसे घेतले आहेत, अशा ५३ रुग्णांना सुमारे साडेतीन लाख रुपये शासनाने परत केले आहेत. अशाप्रकारे रुग्णांकडून पॅकेजपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सुरु झालेल्या या योजनेमध्ये ९७१ आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला साधारण ५० हजारांपासून दीड लाखापर्यंतच्या पॅकेजचा लाभ होतो. दरम्यान, जिल्ह्यात प्रथम २७ खासगी रुग्णालये या योजनेत समाविष्ट होती. ती संख्या आता ३१ वर जाऊन पोहोचली आहे.
विशेषत: या योजनेत समाविष्ट असलेल्या काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णाला ‘हृदयाची झडप बदलण्यासाठी हलक्या दर्जाच्या स्प्रिंगऐवजी अत्याधुनिक व दर्जेदार स्प्रिंग घालूया,’ असे सांगून जादा पैसे उकळण्याचे तसेच दमदाटी करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास व याबाबत कोणाकडे तक्रार केल्यास रुग्णावर पुढील उपचार होणार नाहीत, अशी भीती दाखविण्याचे प्रकार होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांकडून बोलले जात आहे.
अशी असते प्रक्रिया...
मुंबई येथील राजीव गांधी जीवनदायी सोसायटीच्या एम. डी. इंडियाचे या योजनेवर नियंत्रण आहे. या योजनेमधील रुग्णालयांना नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एन.आय.सी.)कडून रुग्णालयाच्या बँक खात्यामध्ये आॅनलाईन पैसे (परतावा) जमा होतात. त्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला सर्वप्रथम त्या रुग्णाचे तंदुरुस्त छायाचित्र व ११ दिवसांनंतर त्याचे तपासणी प्रमाणपत्र आॅनलाईन एन.आय.सी.ला पाठवावे लागते.
रुग्णालय पॅकेजपेक्षा अनावश्यक पैसे घेत असेल, तर संबंधित रुग्णाने त्यासंबंधीची लेखी तक्रार राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अथवा माझ्याकडे द्याव्यात. याबाबत लेखी तक्रार
आल्यास संबंधित रुग्णालयावर निश्चित कारवाई करू.
- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक,
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना.
रुग्णालयाचे बिल (देयक) कमी करून देतो, असे सांगून पैसे मागत असल्याची लेखी तक्रार त्या रुग्णाने विभागाकडे दिली पाहिजे. तसेच संबंधिताने पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली आम्ही कारवाई करू.
- पद्मा कदम,
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.