मध्यवस्तीतील धोकादायक जामदारवाडा जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:40+5:302021-07-04T04:17:40+5:30
कोल्हापूर : येथील आझाद गल्लीतील जामदारवाड्याची धोकादायक स्थितीतील इमारत शनिवारी महापालिका प्रशासनातर्फे जमीनदोस्त करण्यात आला. वाड्यातील कुळ पर्यायी ठिकाणी ...

मध्यवस्तीतील धोकादायक जामदारवाडा जमीनदोस्त
कोल्हापूर : येथील आझाद गल्लीतील जामदारवाड्याची धोकादायक स्थितीतील इमारत शनिवारी महापालिका प्रशासनातर्फे जमीनदोस्त करण्यात आला. वाड्यातील कुळ पर्यायी ठिकाणी स्थलांतर झाल्याने कारवाईत फारसा अडथळा आला नाही.
आझाद गल्लीत शंभर वर्षांपूर्वीचा जामदारवाडा होता. हा वाडा विद्यानंद, जयदीप विलासराव जामदार, मदन वसंतराव जामदार, शाहू राजेंद्र जामदार यांच्या मालकीचा होता. तेथे मालक राहत नव्हते. पण पाच कुटुंबाचे कुळ होते. ही इमारत धोकादायक असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणून महापालिकेचे पथक १५ जून २०२१ रोजी वाडा पाडण्यासाठी गेले. त्यावेळी पर्यायी जागेत स्थलांतर होण्यासाठी चार दिवसांसाठी कुळांनी मुदत मागितली.
चार दिवसांत कुळांनी इमारत पाडण्यास स्थगिती देण्यासंबंधी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने धोकादायक इमारतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास होणाऱ्या धोक्याचा विचार करून स्थगिती आदेश दिला नाही. त्यामुळे शुक्रवारी महापालिकेचे पथक इमारत पाडण्यासाठी गेले. त्यावेळी कुळांनी काही प्रमाणात विरोध केला. पण प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर विरोध मावळला. ते वाड्यातून दुसरीकडे स्थलांतर झाले. त्यानंतर शनिवारी वाड्याची इमारत पूर्णतः पाडण्यात आली.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालय क्रमांक दोन कडील कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, उमेश माने, राजन आळतेकर, पवडी विभागाकडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
चौकट
न्यायालयात गेल्याने विलंब
महापालिका प्रशासन २००४, २०१२, २०१३, २०१६ साली या वाड्याची इमारत पाडण्यासंबंधीची नोटीस दिली. कुळांनी २०१३ च्या नोटीसवर न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर इमारत जमीनदोस्त करण्यात अडचणी आल्या. इमारत पाडण्यास विलंब झाला, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
फोटो :०३०७२०२१-कोल- जामदारवाडा जमीनदोस्त व जामदारवाडा जमीनदोस्त ०१
कोल्हापुरातील जामदारवाड्याची धोकादायक इमारत महापालिका प्रशासनातर्फे जमीनदोस्त करण्यात आली.