राधानगरी तालुक्यात वादळामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:57+5:302021-05-19T04:22:57+5:30
तुरंबे : गेले दीड ते दोन दिवस सुरू असणारे वादळ आणि पावसाचा फटका राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी डोंगर परिसर ...

राधानगरी तालुक्यात वादळामुळे नुकसान
तुरंबे : गेले दीड ते दोन दिवस सुरू असणारे वादळ आणि पावसाचा फटका राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी डोंगर परिसर आणि तुरंबे परिसराला बसला. वादळामुळे अनेक ठिकाणी घरांचे छत उडाले, झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोलमडून वीज वाहिन्या तुटल्याने मोठे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग खूप जास्त असल्याने काही ठिकाणी पत्रे उडून गेले. विशेषता तुरंबे परिसरात वृक्ष कोलमडून वीज वाहिन्यांवर कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला होता. १२ तास सलग काम करीत तुरंबे येथील वायरमन टीमने वीज पुरवठा सुरू केला.
चक्रेश्वरवाडी डोंगर परिसरात झालेल्या वदळामध्ये अनेक घरांचे छत उडाल्याने गरीब लोकांचे संसार उघड्यावर पडले. चक्रेश्वरवाडी येथील आकुबाई सीताराम गुरव या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांची मुले कामानिमित्त बाहेर राहतात. चक्रीवादळामुळे त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामध्ये नुकसान झालेल्या घरांची शासनाकडून पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
महावितरणच्या श्रीनिवास पाटील, अजित बागडी, रूपेश सापळे, अभिजित चौगले, पिंटू चोपडे, शामू घाडगे हे सहा वायरमन भरपावसात काम करत होते. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसात कोलमडलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडून तुटलेल्या वायर वाहत्या नदीच्या प्रवाहातून पोहत जाऊन जोडल्याने वीज पुरवठा सुरू झाला.