‘गॅलिडियर’ शेतीतून दररोज उत्पन्न
By Admin | Updated: December 9, 2014 00:26 IST2014-12-09T00:01:13+5:302014-12-09T00:26:38+5:30
कोगे येथील कृष्णात चव्हाण यांचा शेतीत प्रयोग : गुलाब शेतीतून सलग सहा वर्षे उत्पन्नाचा स्रोत

‘गॅलिडियर’ शेतीतून दररोज उत्पन्न
प्रकाश पाटील - कोपार्डे -नोकरीची शाश्वती नसली तरी हक्काची शेती होती. जवळपास ८ ते १० एक र जमीन असली तरी ती पारंपरिक ऊस पीक शेतीसाठीच वापरली जात होती. यातून मिळणारे उत्पन्न हे ऊस तुटून गेल्यानंतर साखर कारखानदार कधी देतील तेव्हाच, म्हणून कोगे (ता. करवीर) येथील तरुण शेतकरी कृष्णात दत्तात्रय चव्हाण याने दररोज शेतीतून किमान उत्पन्नाचा स्रोत राहावा यासाठी शोध सुरू केला. त्यातून त्यांना गॅलिडियर (गुलाब) हा पर्याय मित्रांनी सुचविला. यातून माहिती व तंत्रज्ञान घेत त्यांनी जून २००९ मध्ये आपल्या जमिनीतील केवळ अर्धा एकर जमीन गुलाब शेतीखाली आणली आहे.
कृष्णात चव्हाण हे ‘गोकुळ’मध्ये रोजंदारीवर होते. मात्र, बरीच वर्षे नोकरी करूनही रोजंदारी नोकरीला कायम नोकरीची हमी मिळेना. त्यातच ८ ते १० एकर असणारी जमीन दुर्लक्षित होऊ लागली म्हणून त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. मात्र, दररोजचा घरखर्च व शेतीचा खर्च भागविण्यासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण मार्ग स्वीकारायचा प्रयत्न त्यांनी केला. मित्राच्या सल्ल्याने त्यांनी गुलाबशेती करण्याचा निर्णय घेतला.
जून २००९ मध्ये कृष्णात यांनी आष्टा (ता. वाळवा) येथून गॅलिडियर (गुलाब)ची जंगली रोपे आणून २० गुंठ्यांत लावण केली. डिसेंबर २००९ मध्ये टपोरी गुलाबाची फुले लागू लागली. तासगाव, विटा या भागांत दुष्काळी परिस्थिती असल्याने तेथून गुलाब फुलांची कोल्हापूरमध्ये आवक कमी होती. त्यातच लग्नसराई असल्याने या हंगामात फुलाला ५ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत दर आला. पहिल्याच वर्षी किमान दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. तेव्हापासून याच रोपांच्या लावणीतून सतत सहा वर्षे आपण किमान वार्षिक लाख ते सव्वा लाख रुपये घेत आहे. दररोज टपोरी फुलांची झाडांना आवक होत असते. दररोज ३०० ते ४०० रुपयांची फुले आपण शेतात, गावात व बाजारात विकत असल्याचे सांगत गॅलिडियर शेती (गुलाब शेती) फायद्याची असल्याचे सांगितले. सर्व खर्च वजा जाता ७० ते ८० टक्के नफा राहत असल्याचेही कृष्णात चव्हाण यांनी सांगितले.
ही शेती उसासारखी आळस करून चालत नाही. दररोज हवामानाप्रमाणे कीड व रोगांचे निरीक्षण करून कीटकनाशक फवारणी करावी लागते. इतर पिकांना जी खते आहेत तीच वापरात आहे. आता ठिबक पद्धतीचा अवलंब केल्याने महिन्यातून एकदाच खुरपणी करावी लागते. ऊसशेतीला पूरक अशी गॅलिडियर शेती (गुलाब शेती) होऊन दररोजचा आर्थिक स्रोत मिळू शकतो.
- कृष्णात चव्हाण