दहीहंडीचा ‘थर’थराट ‘लाख’मोलाचा
By Admin | Updated: September 3, 2015 00:15 IST2015-09-03T00:15:05+5:302015-09-03T00:15:05+5:30
दसरा चौकात रविवारी आयोजन : ‘महाडिक युवा शक्ती’चे तीन लाखांचे पहिले बक्षीस

दहीहंडीचा ‘थर’थराट ‘लाख’मोलाचा
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या असणाऱ्या धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीमध्ये प्रथम क्रमांकासाठी तीन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ६ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता येथील दसरा चौक मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे दहीहंडीचा हा थरार पाहावयास मिळणार आहे. युवा शक्तीच्या दहीहंडीचे सलग सातवे वर्ष आहे.या युवा शक्तीच्या दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आमदार महादेवराव महाडिक यांच्यावतीने दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय युवा शक्तीतर्फे दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामध्ये पाच थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार रुपये, तर सहा थर रचून सलामी देणाऱ्या पथकाला १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच सर्वांत वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सार्थक क्रिएशनच्या वतीने आकर्षक नृत्याचा कार्यक्रम, करवीर प्रशालेच्या विद्यार्थिनींचे झांजपथक याबरोबरच संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे ‘चॅनल बी’वरून थेट प्रक्षेपण, ही युवा शक्ती दहीहंडीची वैशिष्ट्ये आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय अटींचे पालन केल्याचेही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यावेळी रामराजे कुपेकर, मिलिंद धोंड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘गुजरी’ची लाखाची दहीहंडी!
कोल्हापूर : दहीहंडी उत्सवात एक वेगळे आकर्षण निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या गुजरी मित्रमंडळाने यंदा एक लाखाची दहीहंडी लावण्याचे ठरविले असून, दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. दहीहंडीनिमित्त रविवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता देश-विदेशात कार्यक्रम करणाऱ्या मुंबईच्या आविष्कार ग्रुपचा डान्स शो होणार आहे. विविध गाण्यांवर हे कलाकार नृत्यकौशल्य सादर करणार आहेत. प्रमुख आकर्षण दिशा परदेशी आहे. दिशाने २०११ मध्ये ‘मिस महाराष्ट्र’चा किताब मिळविला असून, ती प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने ‘प्रेम पहिलं वहिलं’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच शीतल पाटील व मानसी पाठारे हे कलाकारही आपली अदाकारी सादर करणार आहेत. यावेळी लाईट इफेक्टही दाखविले जाणार आहेत. दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी मंडळातर्फे महिलांची बसण्याची वेगळी व्यवस्था केली आहे. मंडळाचे अध्यक्ष किरण नकाते, कार्याध्यक्ष हर्षल कटके, अमर नकाते, नियाज नणंदीकर, सागर राशिंगकर, संतोष खोगरे, विजय सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, आदी कार्यकर्ते दहीहंडीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
विन ग्रुपची दहीहंडी लाखाची
कोल्हापूर : राजारामपुरी नववी गल्ली येथील विन ग्रुपच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या दहीहंडीच्या बक्षिसाची रक्कम एक लाख २१ हजार रुपये करण्यात आली आहे. रविवारी (दि. ६) सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा दहीहंडी उत्सव होणार आहे.