दादा, तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा!
By Admin | Updated: May 23, 2016 01:02 IST2016-05-23T00:10:24+5:302016-05-23T01:02:13+5:30
हसन मुश्रीफ यांचा टोला : दिल्या उपहासात्मक शुभेच्छा; कोल्हापूरला मिळेल पहिला मान

दादा, तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा!
कोल्हापूर : शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर सरकार स्थिर राहील, अशी व्यवस्था आपण व मुख्यमंत्र्यांनी केल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. त्यामुळे यदाकदाचित मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आलीच तर चंद्रकांतदादा मुख्यमंत्री होतील. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असा उपहासात्मक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. गारगोटी येथील कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘हसन मुश्रीफ कागलमधून पुन्हा आमदार होणार नाहीत, याची पूर्ण तयारी केल्या’चे वक्तव्य केले होते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या या वक्तव्याचा हसन मुश्रीफ यांनी रविवारी समाचार घेतला. ते म्हणाले, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे हे वक्तव्य वाचून आपण अचंबित झालो. जरी शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तरी आपण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे सरकार स्थिर राहील, याची व्यवस्था केल्याचे मंत्री पाटील यांचे वक्तव्य पाहता ते मुख्यमंत्र्यांच्या फारच जवळ गेले आहेत. यदाकदाचित मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आली तर दादा निश्चित मुख्यमंत्री होतील. दादांच्या रूपाने कोल्हापूरला पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार असल्याने आम्हाला आनंद होईल. यासाठी दादांना शुभेच्छा देतो, असा टोला हाणत विधानसभा निवडणुकीसाठी अजून साडेतीन वर्षांचा कालावधी आहे. तत्पूर्वी, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याचा सूचक इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा सूचक इशारा
कागलमधून आपणाला पुन्हा आमदार होऊ द्यायचे नाही, असा चंग चंद्रकांतदादांनी बांधला आहे; पण विधानसभेपूर्वी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, असा सूचक इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला.