‘दादा’ मंडळांचा डॉल्बीला फाटा

By Admin | Updated: September 4, 2016 01:26 IST2016-09-04T00:57:57+5:302016-09-04T01:26:55+5:30

ध्वनिप्रदूषणमुक्तीचा निर्धार : दयावान, हिंदवी, दिलबहार, क्रांती बॉईज, आदींचा समावेश

The 'Dada' Mandal's Dolby Phata | ‘दादा’ मंडळांचा डॉल्बीला फाटा

‘दादा’ मंडळांचा डॉल्बीला फाटा


कोल्हापूर : गणेशोत्सव काळात जिल्हा पोलिस प्रशासनाने डॉल्बीमुक्तीचे आवाहन केले होते. त्यास कोल्हापुरातील दादा अर्थात दरवर्षी मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांनीही प्रतिसाद दिला असून, डॉल्बी लावायचा नाही असा निर्धार केला आहे. यामध्ये दयावान, हिंदवी, दिलबहार, क्रांती बॉईज या मंडळांचा समावेश आहे.
शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जाणीव करून देण्याचे काम अनेक संस्था व पोलिस प्रशासन करून देत आहे. याच पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. याकरिता जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी विविध मंडळांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांना डॉल्बीमुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम आणि डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यानंतर केली जाणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देत आहेत. स्वत: विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, अधीक्षक प्रदीप देशपांडे मंडळांच्या बैठकांमध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहेत. या आवाहनास प्रतिसाद म्हणून दिलबहार तालीम मंडळ, दयावान गु्रप, हिंदवी स्पोर्टस क्लब, शिवाजी पेठेतील बी.जी.एम. स्पोर्टस, महाकाली तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, अवचितपीर तालीम मंडळ, सणगर गल्ली तालीम मंडळ, बोडके तालीम मंडळ, संयुक्त शिवाजी तरुण मंडळ, न्यू गुजरी मित्र मंडळ, तटाकडील तालीम मंडळ, आदी नावाजलेल्या मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बी न लावण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)


असाही निर्धार
दरवर्षी मिरवणूक मार्गावर सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत मिरजकर तिकटी ते महाद्वार रोड या मार्गावर आपलेच मंडळ असावे असा अट्टाहास करणारी अनेक मंडळे आहेत. या मंडळांचे कार्यकर्ते म्हणतात, ‘पदाधिकारी काहीही म्हणू देत आम्ही मात्र ‘दोन बेस दोन टॉप’वर ठाम आहोत.’


ध्वनिप्रदूषणाचा विचार करून यंदा आमच्या गु्रपने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. स्पेशल लाईट इफेक्टचा देखावा भाविकांसमोर सादर करू.
- प्रताप देसाई, अध्यक्ष दयावान गु्रप
पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करू.
- नामदेव लोहार, अध्यक्ष,
क्रांती बॉईज

पोलिस प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून, स्टेरिओ साऊंड सिस्टीमचा वापर करून आम्ही यंदा डॉल्बीच्या भिंतींना फाटा देऊ.
- अमोल माने, पदाधिकारी,
हिंदवी स्पोर्टस

Web Title: The 'Dada' Mandal's Dolby Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.