दादा, रागावू नका हो..!
By Admin | Updated: June 2, 2015 01:21 IST2015-06-02T01:21:09+5:302015-06-02T01:21:09+5:30
हसन मुश्रीफ यांचा टोला : शालूतून टीका करणारे निवेदन

दादा, रागावू नका हो..!
कोल्हापूर : चंद्रकांतदादा तुम्ही रागावू नका..आम्ही तुमच्या घरावर मोर्चा काढला म्हणून आम्हाला शिक्षा करा, परंतु अनेक संकटांनी त्रस्त झालेल्या ऊस उत्पादकांच्या पोटावर मारू नका, इतके हळवे होऊ नका, असा उपरोधिक सल्ला देत आमदार हसन मुश्रीफ यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टोला लगावला आहे.
पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हेतुपुरस्सर माझ्या घरावर मोर्चा काढत असल्याचा आरोप केला होता. त्यास मुश्रीफ यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’एवढी रक्कम राज्यात मिळालेली नाही. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी ‘एफआरपी’ देण्याचा धाडसी निर्णय घेतला. शेवटच्या अंदाजे दोन महिन्यांमध्ये गाळपास आलेल्या उसाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. साखरेचे दर २१०० रुपये क्ंिवटलपेक्षा कमी झाल्यामुळे हे संकट उभे राहिले. विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण सहकारमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ देण्यासाठी २००० कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची फक्त घोषणा केली. अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपली शासकीय विश्रामधामवर १५ मे रोजी भेट घेतली. त्यावेळी आपण १९ मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही निर्णय घेऊ. उशिरात उशिरा ३१ मेपूर्वी पैसे देऊ, असे सांगितले. त्यावेळी आम्ही, जर ३१ मेपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर तुमच्या निवासस्थानावर ६ जूनला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यावर, मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही. जर मोर्चाने आला तर चहा देऊ, असे म्हणालात. मी मुंबईत मंत्रालयात २७ मे रोजी आपणास भेटून ६ जूनच्या मोर्चाची आठवण करून दिली. त्यावेळी आपण जरूर या. माझे उत्तर ठरलेले आहे, असे म्हणालात.
दादा, उसाची व इतर आंदोलने सध्या स्थानिक मंत्र्यांच्या घरासमोर करण्याची प्रथा पाडलेली आहे. उदा. बारामतीला शरद पवार यांच्या घरासमोर, कऱ्हाड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर, इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर, अंगणवाडीच्या व आशा वर्कर भगिनींचा मोर्चा, टोलविरोधी कृती समितीचा मोर्चा तर माझ्या निवासस्थानासमोर आल्यावर मी त्यांचे मंडप घालून स्वागत केले. इतकेच नव्हे तर उसाच्या प्रश्नावर सोलापूरच्या प्रभाकर देशमुख यांनीही आपल्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता.
यापूर्वी जर आपण असे आवाहन केले असते, तर आम्ही मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला असता. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व मोर्चाचे नियोजन झाले आहे. यामध्ये जर बदल केला तर आम्ही घाबरलो, असा लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आमचा नाईलाज आहे.