बापरे! कोरोना रुग्णसंख्या ५९१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:52+5:302021-04-18T04:23:52+5:30

कोल्हापूर : शंभर टक्के लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर पोहचली आहे, ही दुसऱ्या ...

Dad! Corona at 591 patients | बापरे! कोरोना रुग्णसंख्या ५९१ वर

बापरे! कोरोना रुग्णसंख्या ५९१ वर

कोल्हापूर : शंभर टक्के लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर पोहचली आहे, ही दुसऱ्या लाटेतील आजवरची उच्चांकी रुग्णसंख्या ठरली आहे. गुरुवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ३९१ असणारी संख्या २०० वाढून ती शनिवारी एकदम ५९१ वर पोहचली. शुक्रवारी ४५२ रुग्णसंख्या होती, त्यात एकाच दिवशी १३९ ची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा १२ झाला आहे. त्यातील जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे.

कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढल्याने गुरुवारपासून कोल्हापुरात काही अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे, पण ताे मान्य करण्याची नागरिकांची अजूनही मानसिकता दिसत नाही. त्यामुळे कितीही निर्बंध कडक केले तरी खरेदीच्या नावाखाली वर्दळ कायम आहे. लॉकडाऊन कडक होणार म्हणून चार दिवसांपासून लोकांनी बाजारपेठांत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. फिजिकल डिस्टन्सचा कोणताही नियम पाळला नाही. शिवाय, बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. बाहेरून येणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे.

आज एकूण १२ मृत्यू झाले, त्यापैकी ८ कोल्हापूर जिल्ह्यातील. दोन सांगली, एक निपाणी तालुका, एक रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. सीपीआरमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये ५५ वर्षांचा पुरुष कोगनोळी, ता. निपाणी येथील आहे. आयजीएमध्ये मृत्यू झालेला ६० वर्षीय पुरुष कोरोची (ता. हातकणंगले)चा आहे. गडहिंग्लज ग्रामीण रुग्णालयात हनिमनाळ येथील ४५ वर्षीय पुरुष, निलजी येथील ६० वर्षीय पुरुष, सावतवाडी (ता. आजरा) येथील ७५ वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, रुकडी येथील ८० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. कोल्हापूर शहर बुरुड गल्लीतील ७८ वर्षीय महिला, वाळवा तालुक्यातील कुरळप येथील २९ वर्षीय तरुण, साईबाबा कॉलनी गांधीनगर येथील ७३ वर्षीय महिला, मिरज येथील ६८ वर्षीय महिला, पाटीलवाडी मिरजवे (जि. रत्नागिरी) येथील ३७ वर्षीय तरुण यांचा कोल्हापूर शहरातील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला.

कोरोना अपडेट

शनिवार १७ /०४/ २०२१

आजचे रुग्ण : ५९१

आजचे मृत्यू : १२

उपचार घेत असलेले : ३४५३

आजचे डिस्चार्ज : २७६

तालुकानिहाय रुग्णसंख्या

कोल्हापूर शहर : २२५

नगरपालिका : ४९

करवीर : ६२

हातकणंगले : ४६

गडहिंग्लज : ४३

शिरोळ : २५

आजरा : २२

शाहूवाडी : १९

भूदरगड : १६

पन्हाळा : १२

राधानगरी : ०७

गगनबावडा : ०५

चंदगड : ०५

कागल : ०५

ग्रामीण भागातही वाढता कहर

शनिवारी कोल्हापुरात एकूण ५९१ रुग्णसंख्या असली तरी त्यातील महापालिकेचे २२५ व नगरपालिकेचे ४९ रुग्ण आहेत. त्याशिवाय इतर जिल्ह्यांतील ५० रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. हे रुग्ण वजा जाता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २६७ रुग्ण आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील संख्या कमी होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळत आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या करवीर तालुक्यातील आहे.

Web Title: Dad! Corona at 591 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.