दाभोलकरांच्या हौतात्म्याचीही उपेक्षाच
By Admin | Updated: August 9, 2014 00:28 IST2014-08-09T00:20:53+5:302014-08-09T00:28:24+5:30
‘अंनिस’ आक्रमक : मूग गिळून बसलेल्या लोकप्रतिनिधींवर हमीद यांचा हल्लाबोल

दाभोलकरांच्या हौतात्म्याचीही उपेक्षाच
सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विधिमंडळाची दोन अधिवेशने झाली; पण याविषयी प्रश्न विचारावा असे एकाही लोकप्रतिनिधीला वाटले नाही. लोकसभेतही ‘आप’च्या पंजाबमधील खासदाराने प्रश्न उपस्थित केला; पण महाराष्ट्रातील ४८ खासदार मूग गिळून बसले. या निद्रिस्त लोकप्रतिनिधींना आणि मुर्दाड यंत्रणेला समाजानेच आता जागे करावे,’ असा घणाघात डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद यांनी केला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला शनिवारी (नऊ आॅगस्ट) पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. वीस आॅगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता आणि परिणामकारकता वाढविण्याचा निर्णय ‘अंनिस’ने घेतला असून, त्यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे जिल्हा कार्यवाह प्रशांत पोतदार, कुमार मंडपे उपस्थित होते.
गेल्या अडीच महिन्यांपासून केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सुरू आहे; मात्र त्यातही समाधानकारक प्रगती नसल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त करून डॉ. हमीद म्हणाले, ‘सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘अंनिस’बद्दल काहीच माहिती नाही. डॉ. दाभोलकर यांच्या विचारांना विरोध करणारे कोण-कोण होते, याची माहिती घेण्यापासून त्यांना सुरुवात करावी लागली. तत्पूर्वी पोलीस तपासात प्रगतीऐवजी ‘प्लँचेट’सारखे वादग्रस्त मुद्देच अधिक चर्चेत आले. त्याविषयीचे सत्यही समाजापर्यंत पोहोचविण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. विचार मान्य असोत की नसोत, एका सामाजिक कार्यकर्त्याचा खून होणे आणि लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य नसणे ही बाब चिंता वाटायला लावणारी आहे. डॉ. दाभोलकर फक्त ‘अंनिस’चे नव्हते. समाजासाठी त्यांनी बलिदान केले. त्यामुळे समाजानेच आता शासनकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे.’ (प्रतिनिधी)