मुंबई-कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येला अनुक्रमे आठ व सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आरोपींवर खटला भरण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही प्रकरणांतील खटल्यांवर स्थगिती देण्यासाठी सीबीआय व एसआयटीने केलेली याचिका संबंधित विशेष न्यायालयांतून मागे घेतल्याची माहिती सीबीआय व एसआयटीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.
कर्नाटकातील लेखक कलबुर्गी व ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांवर खटला भरला असताना अद्याप दाभोलकर व पानसरे हत्या प्रकरणातील खटला का सुरू झाला नाही, असा सवाल गेल्या सुनावणीवेळी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने सीबीआय व एसआयटीला केला. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे, तर पानसरे हत्येचा तपास एसआयटी करीत आहे.
सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, कर्नाटकमध्ये कलबुर्गी किंवा गौरी लंकेश हत्येप्रकरणी खटला सुरू झाला नाही.
दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणी सीबीआय व एसआयटीचा तपास सुरू असल्याने खटल्याला स्थगिती देण्यासाठी तपास यंत्रणांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवारी हा अर्ज मागे घेण्यात आला असून, खटल्यावरील स्थगिती उठविली आहे, अशी माहिती सिंग व एसआयटीच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंडरगी यांनी न्यायालयाला दिली.
दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर उच्च न्यायालयाने देखरेख ठेवावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका त्यांच्या कुटुंबीयांनी केल्या आहेत. सुनावणीवेळी उच्च न्यायालयात हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, मल्हार पानसरे उपस्थित होते. दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी बाजू मांडली.
हा मोठा कट...
खटला सुरू झाला तरी तपास बंद करणार नाही; कारण या चौघांचे खून हा मोठा कट आहे. फरार आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही दोन्ही यंत्रणांनी न्यायालयाला दिले. त्यावर न्यायालयानेही आपण हा तपास आपल्या देखरेखीखालीच सुरू ठेवू, असे स्पष्ट केले. त्यामुळे खटला सुरू असतानाच तपासामध्ये काही नवीन तथ्ये आढळली तर ती खटल्यामध्ये समाविष्ट करण्यात येतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
याचिकांवर १५ एप्रिलला सुनावणी
आम्ही त्या हत्येच्या मुळाशी जाऊ आणि तपास यंत्रणेलाही जावे लागेल. अशा घटना महाराष्ट्रासारख्या आधुनिक राज्यात घडत असतील, तर विचार करावा लागेल. आम्ही या याचिका निकाली काढणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करीत १५ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे.
१२ आरोपी... पाच चार्जशीट...
दाभोलकर-पानसरे खून खटल्यात एकूण १२ संशयित आरोपींवर पाच चार्जशीट दाखल झाली आहेत. त्यांतील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. दोघे जामिनावर सुटले आहेत; तर इतर आठ अन्य गुन्ह्यांत अटकेत आहेत.
-------------------------------