दाभोलकर, पानसरे यांचे खुनी शोधतो!
By Admin | Updated: March 16, 2015 23:25 IST2015-03-16T23:25:55+5:302015-03-16T23:25:55+5:30
भोंदू ज्योतिषाचा दावा : रत्नागिरीच्या ‘लोलकविद्येचे भूत’ उतरविले

दाभोलकर, पानसरे यांचे खुनी शोधतो!
सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनी लोलकविद्येच्या जोरावर शोधून काढेन, असा सनसनाटी दावा सोमवारी फसवणूकप्रकरणी अटक केल्यानंतर एका भोंदू ज्योतिषाने चक्क पोलिसांसमोरच केला. कथित लोलकविद्येच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्याचा दावा करणारा आणि ७२ रोगांचे निवारण मंत्राने करीत असल्याची जाहिरात करणारा हा कथित ज्योतिषी सोमवारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अलगद अडकला.
मूल होण्यासाठी मंत्र-तंत्राचे तोडगे सुचवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शाहूपुरी पोलिसांनी या ज्योतिषास अटक केली आहे. विश्वास भालचंद्र दाते असे त्याचे नाव असून, तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, श्रीनिवास जांभळे हे विविध समस्या घेऊन दातेच्या यादोगोपाळ पेठेतील कार्यालयात पूर्वीच जाऊन आले होते. सोमवारी सकाळी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दातेचा पर्दाफाश करण्याची तयारी केली. पोतदार यांनी आपल्याला मूल होत नसल्याचे दातेला सांगितले होते. त्याने पोतदार यांना पत्नीसह बोलावले होते. अडीचशे रुपये दक्षिणाही सांगितली होती. त्यानुसार ‘अंनिस’ कार्यकर्ते आणि पोलिसांनी चतुराईने योजना आखलीस्थानिक गुन्हे शाखेतील महिला कॉन्स्टेबल मोनाली निकम या पोतदार यांच्यासोबत गेल्या. त्यांची ओळख पोतदार यांच्या पत्नी म्हणून करून देण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक नितीन जाधव हे पोतदार यांचा ‘मेहुणा’ बनून सोबत गेले. बारा वर्षे झाली तरी मूल होत नाही, तसेच आपल्याला दारूचे व्यसन आहे, असेही पोतदार यांनी दातेला सांगितले. यावर दातेने अजब ‘उपाय’ सांगितले; तसेच आपला आत्मा पोतदार यांच्या घरी आणि मूळ गावीही ‘जाऊन आल्याचे’ सांगितले.
लोकविद्येच्या बळावर सर्व समस्यांवर उपाय करीत असल्याचा दावा त्याने वारंवार केला. नंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांनी आपले मूळ रूप उघड केले आणि दातेला ताब्यात घेतले. बाहेर उभे असलेले कार्यकर्ते त्याच वेळी आत गेले आणि दाते अलगद जाळ्यात सापडला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दैवी औषध आणि उपचार जाहिरात प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंडविधानाच्या कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस ठाण्यात दातेने अजब दावा केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात प्लँचेट झाल्याचे कथित प्रकरण गाजले असतानाच, ‘दाभोलकरांसह कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनीही मी लोलकविद्येच्या मदतीने शोधून काढून दाखवेन,’ असे तो पोलिसांसमोरच म्हणाला. (प्रतिनिधी)