दाभिल, इटे रास्त धान्यचा परवाना रद्द
By Admin | Updated: February 25, 2015 00:39 IST2015-02-24T21:29:19+5:302015-02-25T00:39:23+5:30
८५ दिवस आंदोलन : शेवटी मुक्ती संघर्ष समितीस मिळाले यश

दाभिल, इटे रास्त धान्यचा परवाना रद्द
आजरा : दाभिल (ता. आजरा) येथील रास्त धान्य दुकान परवानाधारक जयश्री विठोबा यादव यांचा रास्त भाव धान्य दुकान परवाना व केरोसीन परवाना मुक्ती संघर्ष समितीने ८५ दिवसांचे ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे, तर असाच आदेश इटे (ता. आजरा) येथील मंगल शिवाजी कांबळे यांना देण्यात आल्याने इटे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.दाभिल येथील रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक जयश्री यादव यांच्याकडून होणाऱ्या धान्य व रॉकेलवाटपात त्रुटी आहेत. शिधापत्रिकाधारकांना योग्य वागणूक मिळत नाही असा आरोप करीत परवाना रद्द करण्यासंदर्भात गेले दीड वर्ष ग्रामस्थांकडून आंदोलन सुरू होते. याबाबत मुक्ती संघर्ष समितीने आक्रमक होत २ डिसेंबरपासून आजरा तहसीलसमोर ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता. सलग ८५ दिवस हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून चार दिवसांचे उपोषण संग्राम सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.तालुका पुरवठा अधिकारी, तहसीलदार उपविभागीय अधिकारी व आयुक्त असा कागदी फायलींचा प्रवास सुरू होता. अखेर या विषयावर बराच काथ्याकुट झाला.
अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले दुकान तपासणीचे आदेश गांभीर्याने घेत रास्त भाव धान्य दुकानासह केरोसीन वाटप परवाना अनामत रक्कम जप्तीसह रद्द केल्याचा आदेश दिला आहे. असाच निर्णय इटे येथील मंगल शिवाजी कांबळे यांच्या रास्त धान्य दुकान परवाना व केरोसीन वाटप परवान्याबाबत घेण्यात आला आहे. इटे ग्रामस्थांच्या कांबळे यांच्याविरोधातील लढ्याला यश आले आहे. (प्रतिनिधी)
अखेर यश मिळाले : संग्राम सावंत
गेले दीड वर्ष दाभिल येथील रास्त भाव धान्य दुकानदाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. हे आंदोलन सुडबुद्धीने केलेले नव्हते. त्यामुळे इतर धान्य दुकानदारांनी गैरसमज करून घेऊ नये. दुकानदारांचे काही प्रश्नही मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहू, असे स्पष्ट केले.
ग्रामस्थांचा जल्लोष
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुकान परवाना रद्दचे आदेश प्राप्त झाल्यानंतर इटे
व दाभिल ग्रामस्थांनी जल्लोष केला.