‘डी. वाय.’ ग्रुपने सोडला ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:35+5:302021-09-19T04:24:35+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घातलेल्या रमणमळा येथील ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कचा ताबा डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या ज्ञानशांती ॲण्ड कंपनीने ...

‘डी. वाय.’ ग्रुपने सोडला ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कचा ताबा
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घातलेल्या रमणमळा येथील ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कचा ताबा डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या ज्ञानशांती ॲण्ड कंपनीने सोडला आहे. महापालिकेतील राजकीय वादातून सतत होत असलेल्या आरोपांमुळे कराराला मुदतवाढ न देण्याची विनंती या ग्रुपने केली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पर्यटन आणि सौंदर्य वाढविणारा हा प्रकल्प आता बंद पडणार आहे. यातून महापालिकेबरोबरच कोल्हापूरच्या पर्यटनालाही मोठा फटका बसणार आहे.
महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या ज्ञानशांती ॲण्ड कंपनी यांच्यामध्ये रमणमळा येथे असलेल्या तलावाचे सुशोभिकरण करून तेथे वॉटरपार्क उभारण्याचा करार १५ मे २००१मध्ये झाला होता. वीस वर्षांचा हा भाडेकरार होता. पण वीस वर्षांनंतर आणखी नऊ वर्षे करार वाढविण्याची तरतूद या करारात करण्यात आली होती. वीस वर्षांची मुदत १३ मे २०२१ रोजी संपली. या करारानुसार आणखी नऊ वर्षे मुदतवाढ मागण्याची तरतूद होती. त्यामुळे आणखी नऊ वर्षे हा प्रकल्प ज्ञानशांती ग्रुपच्या ताब्यात राहिला असता. पण गेल्या काही वर्षांत या प्रकल्पावरून सतत आरोप होत राहिले. डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी हा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर चांगले सुशोभिकरण केले. त्यासाठी मोठी रक्कम खर्च करून तलावाचे रूप पालटले. कोल्हापूरच्या पर्यटनात यामुळे भर पडली. राज्याच्या विविध भागातून पर्यटक या वॉटरपार्कमध्ये येतात. पार्कमध्ये लग्नापासून ते विविध कार्यक्रम होतात.
पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात काही वर्षांपूर्वी राजकीय संघर्ष सुरू झाला. या संघर्षातून एकमेकांच्या संस्था व प्रकल्पांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. यातूनच माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम यांनी वाटरपार्कच्या घरफाळ्याचा मुद्दा पुढे आणला. या जागेचा घरफाळा भरला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने घरफाळा आम्ही भरण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपने घेतली. महापालिकेशी झालेल्या करारानुसार घरफाळा कंपनीने भरण्याबाबत उल्लेख नसल्याने घरफाळा भरण्यासाठी नोटीस काढण्याची विरोधकांची मागणी महापालिकेने मान्य केली नाही.
त्यामुळे कोणतीही निवडणूक आली की, पार्कच्या घरफाळ्याचा विषय विरोधकांकडून ऐरणीवर आणण्यात येऊ लागला. शेवटी या वादाचे पडसाद म्हणून वॉटरपार्कचा करार पुढे न वाढविण्याचा निर्णय ज्ञानशांती ग्रुपने घेतला आहे. तसे पत्र कंपनीने महापालिका आयुक्तांना दिले आहे. आपला वीस वर्षांचा करार संपला असून, मुदतवाढीची कंपनीची कोणतीही इच्छा नाही. त्यामुळे जागा ताब्यात घेण्याची तजवीज करावी, अशी विनंती पत्राव्दारे महापालिकेला करण्यात आली आहे.
कोट
महापालिकेशी केलेल्या करारातील सर्व नियम पाळून वॉटरपार्क चालवले जात होते. कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या प्रकल्पाबाबत माजी नगरसेवक सुनील कदम आणि सत्यजित कदम यांनी सतत खोटे आरोप करत बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सततच्या खोट्या, निराधार आरोपांमुळे ‘डी. वाय. ग्रुप’ने कराराला मुदतवाढ घेण्यास नकार दिला. नाहक आरोप करणाऱ्यांमध्ये हा पार्क चालविण्याची क्षमता नाही. यामुळे डॉ. संजय डी. पाटील यांनीच यापुढेही पार्क चालविण्याचा निर्णय घ्यावा.
- अशोक जाधव, ज्येष्ठ माजी नगरसेवक
चौकट
१०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
वॉटरपार्कबाबतचा करार संपुष्टात येणार असल्याने हा प्रकल्प आता बंद पडण्याचीच चिन्हे अधिक आहेत. हा पार्क बंद राहिल्यास तेथील ९० ते १०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. यामुळे त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होणार आहे.