झाडे जगविण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे १५ टँकर; ऋतुराज पाटील यांचा पुढाकार : शेंडा पार्क पुन्हा हिरवागार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:11+5:302020-12-30T04:31:11+5:30
कोल्हापूर : शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेली झाडे जगविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपकडून रोज पंधरा ...

झाडे जगविण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे १५ टँकर; ऋतुराज पाटील यांचा पुढाकार : शेंडा पार्क पुन्हा हिरवागार होणार
कोल्हापूर : शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेली झाडे जगविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपकडून रोज पंधरा टँकरद्वारे झाडांना पाणी देण्याचे नियोजन केल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले. या झाडांच्या संवर्धनासाठी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून तात्काळ निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.
विविध स्वयंसेवी संस्था आणि युवकांच्या सहभागातून या झाडांचे मल्चिंग करण्याचा निर्णय झाला. मंगळवारी ‘लोकमत’मध्ये त्यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द झाले होते व त्यासाठी समाजाच्या मदतीचा हात आवश्यक असल्याचे म्हटले होते.
शेंडा पार्कात आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची तासभर पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकारी, पाचगाव, मोरेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या आगीची सुमारे २५ हजार झाडांना झळ पोहोचली असून लहान सुमारे ३ हजार झाडे पूर्णपणे जळाली, उर्वरित झाडांना जर पाणी दिले, तर ती झाडे जगातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मोरेवाडी, पाचगाव ग्रामपंचायत सुद्धा पाणी देण्यासाठी सहकार्य करेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. जी ३ हजार झाडे जळाली आहेत, ती सामाजिक वनीकरण विभागाने पुन्हा नव्याने लावावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.
आमदार पाटील यांनी पुढाकार घेतल्याने ही झाडे जगविण्यासाठी पाठबळ मिळेल, असे वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुड्डे यांनी सांगितले. पाचगाव आणि मोरेवाडी ग्रामपंचायती सर्व सहकार्य करतील, अशी ग्वाही पाचगावचे सरपंच संग्राम पाटील आणि मोरेवाडीचे सरपंच दत्तात्रय भिलुगडे यांनी दिली.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस. आर. शिंदे, सहायक वन संरक्षक एम. बी. चंदनशिवे, उद्यान विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. सावंत, करवीरचे वनपाल एस. बी. देसाई यांच्यासह पाचगाव, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आणि वृक्षप्रेमी उपस्थित होते.
२९१२२०२०-कोल-शेंडा पार्क न्यूज
आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरातील आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांची मंगळवारी पाहणी केली. यावेळी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, मोरेवाडीचे सरपंच दत्तात्रय भिलुगडे आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.