‘धर्मवीर’कडे डी. सी. नरके फुटबॉल चषक
By Admin | Updated: February 17, 2015 00:05 IST2015-02-16T23:56:55+5:302015-02-17T00:05:35+5:30
एकवीस हजारासह चषक : खुपिरेचा शिवाजी क्लब उपविजेता

‘धर्मवीर’कडे डी. सी. नरके फुटबॉल चषक
कोपार्डे : कुंभी-कासारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष डी. सी. नरके ग्रामीण फुटबॉल स्पर्धेत उचगावच्या धर्मवीर फुटबॉल क्लबने खुपिरे (ता. करवीर) येथील शिवाजी फुटबॉल क्लबवर एकमेव गोल नोंदवीत स्व. डी. सी. नरके चषक व २१ हजारांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.कुडित्रे येथील डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या पटांगणावर हा अत्यंत चुरशीचा सामना झाला. धर्मवीर (उचगाव) व शिवाजी (खुपिरे) दरम्यान झालेल्या सामन्यात पहिल्या सत्रात धर्मवीरचा फॉरवर्ड खेळाडू रोहित खंचनाळे, सूरज हकीम यांनी पहिल्या हापमध्ये वाऱ्याचा फायदा घेत शिवाजी खुपिरेवर आक्रमण चढविले. यात त्यांना यश आले. सूरज हकीम याने पेनाल्टी ‘डी’ पासून सरळ मारलेला चेंडू गोलमध्ये गेल्याने पहिल्या सत्रात धर्मवीर फुटबॉलने १ विरुद्ध ० अशी आघाडी घेतली. हीच आघाडी सामन्याच्या शेवटपर्यंत शिवाजी (खुपिरे)वर टिकविण्यात धर्मवीर (उचगावला) यश आले. संपूर्ण सामना वेळेत धर्मवीरलाच गोंल नोंदविता आल्याने १ विरुद्ध ० अशा गोलने विजय मिळविला. दुसऱ्या क्रमांकावर शिवाजी (खुपिरेला) समाधान मानावे लागले. त्यांना रोख १५ हजार व चषक देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात साई एज्युकेशन फुटबॉल क्लब (गिजवणे, ता. गडहिंग्लज)ने पाडळी खुर्द क्लबवर १ विरुद्ध ० गोलने विजय मिळविला. स्पर्धेत उत्तम कामगिरीबद्दल सूरज हकीम-मॅन आॅफ दि मॅच, अमित दळवी-बेस्ट गोलकीपर, प्रशांत पाटील-बेस्ट डिफेन्स, राजेश सुतार-बेस्ट हाफ, तर अवधूत पाटीलला बेस्ट फॉरवर्ड म्हणून ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आ. चंद्रदीप नरके, कुंभी बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके, ज्ञानदेव पडवळ, ‘कुंभी’चे संचालक शंकर पाटील, भरत खाडे, प्राचार्य बी. डी. खडके, माणिक मंडलिक, संभाजी मांगुरे-पाटील उपस्थित होते.