सिलिंडरच्या स्फोटात घराला आग

By Admin | Updated: October 18, 2015 01:21 IST2015-10-18T00:46:37+5:302015-10-18T01:21:13+5:30

पाच लाखांचे नुकसान : चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुकची घटना

Cylinder bomb blast in house | सिलिंडरच्या स्फोटात घराला आग

सिलिंडरच्या स्फोटात घराला आग

चंदगड : शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील शेतकरी वैजनाथ गुंडू गवसेकर यांच्या घराला शॉर्टसर्किटने शनिवारी आग लागली. या आगीत सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर बेचिराख झाले. आगीत प्रापंचिक साहित्यासह पाच लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मराठी शाळेजवळ कल्मेश्वर गल्लीत असलेल्या वैजनाथ गवसेकर यांच्या घराला शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. घरात कोणीच नसल्याने प्रथमत: आगीची कल्पना आली नाही. पण, वाऱ्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.
आगीचे लोळ दिसल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. कामानिमित्त बाहेर गेलेल्या निंगुबाई गवसेकर घरी आल्यानंतर घरी गॅस असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. आगीचे रौद ्ररूप पाहून सिलिंडर काढण्यास कोणीही तयार झाले नाही.
दरम्यान, आगीच्या भडक्याने सिलिंडरचा स्फोट झाला व पुन्हा आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आगीचे तांडव इतके भयानक होते की, आग आटोक्यात आलीच नाही. शेवटी बेळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तीन तासांच्या परिश्रमानंतर अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश आले.
या आगीत या शेतकऱ्याचे तिजोरी, कपाट जळले. या कपाटात रोख ४0,000, महत्त्वाची कागदपत्रे, विमा प्रमाणपत्र, २0 पोती भात, नाचणा, सोन्याचे गंठण, चेन, संसारपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वैजनाथ गवसेकर यांच्या घराला लागून असलेल्या भरमू कृष्णा गवसेकर यांच्या घरालाही आग लागून स्वयंपाक घरातील साहित्य जळाले आहे.
दरम्यान, मंडळ अधिकारी एन. के. मुत्नाळे, तलाठी व्ही. एल. कांबळे व चंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)

Web Title: Cylinder bomb blast in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.