बससेवेविना वस्त्रनगरीत सर्वसामान्यांची परवड
By Admin | Updated: November 12, 2014 23:27 IST2014-11-12T22:12:49+5:302014-11-12T23:27:52+5:30
वृद्ध, लहान मुले, महिलांचे हाल : पर्यावरणासाठी आणि सर्वांसाठी उपयोगी

बससेवेविना वस्त्रनगरीत सर्वसामान्यांची परवड
राजाराम पाटील : इचलकरंजी ::सर्वसामान्यांबरोबर मध्यमवर्गीय, श्रीमंत वर्ग यांना परवडणारी, पर्यावरणासाठी महत्त्वाची, वृद्धांबरोबर लहान मुले आणि विशेषत: महिला वर्गासाठी अनन्यसाधारण उपयोगाची शहर बस वाहतूक सेवा वीस वर्षांपूर्वी बंद पडली. त्यानंतर वस्त्रोद्योगाच्या विकासाबरोबर वाढत्या व्यापामुळे शहराची लोकसंख्या दुप्पट होऊन तीन लाख झाली; पण चर्चेपलीकडे शहर बस वाहतुकीकडे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेच नाही.
वस्त्रोद्योगासाठी व बाजारपेठेमुळे आणि माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणामुळे आसपासच्या पन्नास-साठ खेडेगावांचा दैनंदिन संपर्क आहे. या गावांतील साठ-सत्तर हजार लोक दररोज ये-जा करीत असतात. सध्या असलेली एसटी बस वाहतूक तुटपुंजी असल्याने लोकांना वडाप आॅटोरिक्षाचा वापर करावा लागतो. आॅटोरिक्षामध्ये ‘वडाप’ नावाप्रमाणेच प्रवासी माणसांना कोंबून बसविले जाते. ६ आसनी रिक्षामधून १०-१२ माणसांचे वडाप होते. त्यामध्ये लहान मुले व स्त्रियांचे हाल होतात.
वीस वर्षांपूर्वी एसटीने कबनूर ते यड्राव सूतगिरणी आणि आयको स्पिन (शिरदवाड) ते कोरोची अशा मार्गांवर काही वर्षे शहर वाहतूक सेवा चालविली. मात्र, तत्कालीन बस वाहतूक तोट्यात जाऊ लागल्याने वाहतुकीतील नुकसानीची रक्कम इचलकरंजी नगरपालिकेने द्यावी, अशी मागणी एसटीने केली आणि नुकसानीची रक्कम त्यावेळी पालिका देतही असे; पण नगरपालिकाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने नुकसानीची रक्कम देणे पालिकेने बंद केले. त्यानंतर एसटीने रडतखडत काही महिने शहर बससेवा चालविली आणि बंद केली. त्याला वीस वर्षे उलटली.
या वीस वर्षांत इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा विकास झाला. उद्योगधंद्यांच्या वाढत जाणाऱ्या व्यापाबरोबर लोकसंख्याही वाढली. शहरातील राहणीमान महाग असल्याने तुलनेने स्वस्त असलेल्या आसपासच्या २५ ते ३० खेडेगावांत कामगार-कष्टकरी-नोकरदार राहतात आणि तेथून दररोज येथे येतात आणि परत जातात. अशांची संख्या साठ-सत्तर हजार आहे. तर खुद्द इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाख आहे. त्यापैकी बहुतांश कामगार वर्ग असल्याने त्यांना शहर वाहतूक सेवा परवडणारी आहे. त्यामुळे शहर बस वाहतूक सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. (समाप्त)
आसपासच्या खेडेगावांतही वस्त्रोद्योग
येथील उद्योगधंद्यासाठी कामगार, नोकरदार दररोज इचलकरंजीत येतात. त्याप्रमाणे आसपासच्या कबनूर, रुई, तिळवणी, साजणी, चंदूर, जंगमवाडी, रांगोळी, रेंदाळ, माणकापूर, बोरगाव, लाट, शिरदवाड, शिवनाकवाडी, शिरढोण, टाकवडे, यड्राव, तारदाळ, खोतवाडी, कोरोची, हातकणंगले, आदी गावांमध्ये यंत्रमाग, सायझिंग व तत्सम उद्योगांचे कारखाने झाले आहेत. त्यांचीही दररोजची वाहतूक इचलकरंजीस असते.
शहर बससेवेचे मार्ग
१) मजले, तारदाळ, खोतवाडी, यड्राव (पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट)
२) शिरढोण-टाकवडे.
३) अब्दुललाट (लाटवाडी), शिरदवाड, शिवनाकवाडी (आयको स्पिन).
४) हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी, माणकापूर.
५) पट्टणकोडोली, इंगळी, रुई, कबनूर.
६) माणगाव, नवमहाराष्ट्र, साजणी, तिळवणी.
७) हातकणंगले, हातकणंगले रेल्वे स्टेशन, कोरोची, गंगानगर.
८) लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, तिळवणी, कबनूर.
९) तारदाळ, शहापूर.
१०) चंदूर, आभार फाटा-कलानगर.