संस्थाचालक-शिक्षकांच्या वादावर अखेर पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:47+5:302021-01-08T05:14:47+5:30
कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी जे काही आरोप व चुका झाल्या त्या दुरुस्त ...

संस्थाचालक-शिक्षकांच्या वादावर अखेर पडदा
कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी जे काही आरोप व चुका झाल्या त्या दुरुस्त करु. शिक्षकांना अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका घेत संस्थेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांसोबत झालेल्या वादावर पडदा टाकला. यासंदर्भात शिक्षक आमदार जयंत आसगावकर व सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समिती आणि संबधित संस्थेचे संचालक यांची सोमवारी शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक भवनात बैठक घेतली. या बैठकीत जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली.
जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत मुख्याध्यापक संजय पाटील यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याविरोधात शनिवारी नागरी संघटना कृती समितीने मूक धरणे आंदोलन केले होते. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी शिक्षक आमदार आसगावकर यांनी सोमवारी मुख्याध्यापक भवनमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीत शिक्षकांच्यावतीने मुख्याध्यापक पाटील यांनी एकूण ३८ आरोप लेखी स्वरुपात सादर केले होते. त्यावर संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी प्रथम मला याबाबत येथे काहीच बोलायचे नाही. मी जे काय म्हणणे आहे, ते चौकशी समितीसमोर सादर करेन, असे उत्तर दिले. त्यावर रमेश मोरे, मुख्याध्यापक पाटील व अन्य शिक्षकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. यावेळी हस्तक्षेप करत आमदार आसगावकर यांनी हे काही न्यायालय नाही. परंतु, माणुसकीच्या नात्याने व संस्था वाचली पाहिजे आणि कोल्हापूरचे नाव राज्यात कुठे खराब होऊ नये याकरिता ही बैठक बोलावल्याचे जाधव यांना सुनावले. त्यानंतर जाधव यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यावर समाधान न झाल्यामुळे शिक्षक व कृती समितीने चौकशी समिती नेमावी, त्यात सर्व सदस्यांचा समावेश असावा, अशी भूमिका घेतली. त्यानंतर सर्वमान्य अशी एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन करण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षण प्रशासन अधिकारी एस. के. यादव, कृती समितीचे अशोक पोवार, संभाजीराव जगदाळे, संस्थाचालक संघटनेचे वसंतराव देशमुख, शिक्षक संघटनेचे एस. डी. लाड, दादा लाड, भरत रसाळे, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.
चौकट
जिल्हा तक्रारमुक्त झाला पाहिजे, याकरिता अशाप्रकारे बैठक बोलविण्याचा उपक्रम प्रथमच राबविला. दोन्ही बाजू समजून चौकशी समिती स्थापन केली.
- जयंत आसगावकर, शिक्षक आमदार