आरक्षण सोडतीची उत्सुकता

By Admin | Updated: June 30, 2016 23:31 IST2016-06-30T23:31:09+5:302016-06-30T23:31:49+5:30

नगरपालिका निवडणूक : प्रभागरचना सुद्धा आजच जाहीर होणार

Curiosity for Reservation Leads | आरक्षण सोडतीची उत्सुकता

आरक्षण सोडतीची उत्सुकता

इचलकरंजी : नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणांच्या सोडती आज, शुक्रवारी संबंधित नगरपालिकांमध्ये काढण्यात येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेचे नकाशे व चतु:सीमासुद्धा जाहीर होणार असल्याने प्रभाग व आरक्षण सोडतीविषयी कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
सन २०११ मध्ये निवडणुका झालेल्या नगरपालिकांच्या नगरसेवकांचा कालावधी डिसेंबर २०१६ मध्ये संपुष्टात येत आहे. यापूर्वीच्या निवडणुका २००१ मधील जनगणनेनुसार झाल्या होत्या. आता होणारी निवडणूक सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यामुळे इचलकरंजीमध्ये नगरसेवकांची संख्या पाच, जयसिंगपूरमध्ये दोन व कागलमध्ये दोन अशी वाढली आहे. त्याचबरोबर निवडणुकांच्या प्रभाग रचना करताना सदरची प्रभाग रचना जनगणनेच्या गणानुसार करावी, असे निर्देश देण्यात आले होते. प्रभाग रचनेविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे प्रभागांच्या नकाशांबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. असे हे प्रभाग आज, शुक्रवारी प्रभागनिहाय सोडती काढताना लावण्यात येणार आहेत.
प्रभागांचे अनुक्रम संबंधित शहराच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे या पद्धतीने व इंग्रजी झेड आकारानुसार पडणार आहेत. याशिवाय प्रभागांचे लोकसंख्येतील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येनुसार प्राधान्यक्रमाने अनुसूचित जातीची आरक्षणे दिली जाणार आहेत. त्या आरक्षण सोडती निघाल्यानंतर उर्वरित प्रभागांमध्ये प्रथम नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्ग अशा प्रकारे पुढील सोडती काढण्यात येऊन प्रत्येक प्रभागात एक महिला व एक पुरुष असेही आरक्षण असणार आहे.
त्यामुळे शुक्रवारी संबंधित नगरपालिकांमध्ये आरक्षण सोडती होत असताना त्यावेळी जाहीर होणारे प्रभाग आणि प्रभागनिहाय टाकण्यात येणाऱ्या आरक्षण सोडती याबाबत कमालीची उत्सुकता आहे. अशा प्रभाग रचना व त्यावर पडलेली आरक्षणे याबाबत ५ जुलै ते १४ जुलै या कालावधीत संबंधित पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)


नऊ नगरपालिकांच्या एकाचवेळी सोडती
जिल्ह्यातील इचलकरंजी, मलकापूर, पन्हाळा, जयसिंगपूर, मुरगूड, कागल, कुरुंदवाड, गडहिंग्लज व वडगाव या नगरपालिकांमध्ये आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता आरक्षण सोडती काढण्यात येणार आहेत. इचलकरंजी येथे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली, मलकापूर येथे विशेष भूमापन अधिकारी स्वाती देशमुख, पन्हाळा येथे प्रांताधिकारी रवींद्र खाडे, जयसिंगपूर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी, मुरगूड येथे प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, कागल येथे प्रांताधिकारी मोनिका सिंग, कुरुंदवाड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी संगीता चौगुले व वडगाव येथे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या ठिकाणच्या आरक्षणाच्या सोडती निघणार आहेत.

Web Title: Curiosity for Reservation Leads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.