सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब

By Admin | Updated: October 9, 2014 00:46 IST2014-10-09T00:44:29+5:302014-10-09T00:46:27+5:30

भालचंद्र नेमाडे : श्रमिक प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान; प्रादेशिक, राष्ट्रीय, वैश्विक मूल्यांची केली उकल

Cultured people are far from politics | सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब

सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब

कोल्हापूर : प्रगत म्हणविणाऱ्या राष्ट्रात जनतेशी साधर्म्य असलेलाच नेता त्यांचे नेतृत्व करतो. मात्र, आपल्या देशात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी असतानाही ६० टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच निवडून येतात. त्यामुळेच सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब जात आहेत. लोकशाहीची ही बदलत जाणारी मूल्ये एक दिवस देशाला हिटलरशाहीकडे घेऊन जातील, असे सूचक वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज, बुधवारी येथे केले.
दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘प्रादेशिक ते जागतिक’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. गोविंद पानसरे होते. प्रा. रणवीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा भालचंद्र नेमाडे यांचे मेघा पानसरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रमिक प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित पुस्तकांचा संच नेमाडे यांना भेट देण्यात आला.
महाभारत, रामायण, आर्य, ‘मुंडा’ आदिवासी, टिपू सुलतान, ईस्ट इंडिया कंपनी, कान्होजी आंग्रे, अल्लाउद्दीन खिलजी ते युरोपातील तत्त्वज्ञ, आदींचे दाखले देत, भालचंद्र नेमाडे यांनी प्रादेशिक, राष्ट्रीय व वैश्विक मूल्ये अत्यंत साध्या व सोप्या उदाहरणांसह समजावून दिली.
नेमाडे म्हणाले, प्रादेशिक मूल्यांमध्ये नैतिकता असते. मानवतेला टिकवून ठेवण्याची ताकद असते. ती ताकद राष्ट्रीय मूल्यांमध्ये असत नाही. सोयीचा राष्ट्रवाद पेरून, खोट्या इतिहासाच्या आधारेच राष्ट्राची निर्मिती होते. भौगालिक विविधतेनुसार मानसिक व शारिरीक विविधता निर्माण होते. त्यामुळे प्रादेशिकतेनुसार लोकांचा आचार, विचार, आचरण यांत फरक पडतो. स्वातंत्र्य व समता ही एकत्र नांदूच शकत नाहीत. हद्दी व मर्यादांवरच लोकांचे भाषिक, प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा वैश्विक असणे अवलंबून असते. माणसाने कमीत कमी प्रादेशिक असावे. पायाशी प्रादेशिक जमिनीचा तुकडा असल्यानंतरच वैश्विक होता येते. (प्रतिनिधी)

जोहार..!
नेमाडे यांनी ‘जोहार’ म्हणत बोलण्यास सुरुवात केली. ‘जोहार’ हा शब्द किमान ६० हजार वर्षांपासून बोलीभाषेत प्रचलित आहे. रामराम, नमस्कार, आदी शब्द तीन हजार वर्षांपेक्षा अधिक पूर्वीचे नाहीत. च, झ, छ, आदी दंतिक अक्षरे फक्त मराठीतच आहेत. यांचा उच्चार ज्यांना येत नाही ते अमराठी आहेत हे सहज ओळखता येते. महाराष्ट्रातील ‘मुंडा’ या आदिवासी जमातीला ६० हजार वर्षांचा इतिहास असल्याची माहिती नेमाडे यांनी देताच सभागृह स्तंभित झाले.

Web Title: Cultured people are far from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.