शेतकऱ्यांसाठी शीतगृहे उभी करणार
By Admin | Updated: August 1, 2015 00:53 IST2015-08-01T00:52:10+5:302015-08-01T00:53:39+5:30
हसन मुश्रीफ : कार्वे येथे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा प्रचार मेळावा

शेतकऱ्यांसाठी शीतगृहे उभी करणार
चंदगड : शेतकऱ्यांच्या पिकाला जादा दर कसा मिळेल, याचा विचार करून तालुक्यात पिकणाऱ्या काजू, रताळी, बटाटा, भाजीपाला, सोयाबीन ही पिके साठवणूक करून योग्य दर मिळाल्यास विक्री करता यावीत, यासाठी बाजार समितीतर्फे शीतगृहांची सोय करणार, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, ‘दौलत’ कारखाना सभासदांचा राहावा ही प्रामाणिक इच्छा असली, तरी गेली चार वर्षे बंद स्थितीत असलेला हा कारखाना चालू करण्यास अनेक अडचणी आहेत. जिल्हा बँकेचे थकीत देणे वसूल होणे तत्काळ गरजेचे आहे. बँकेचे पैसे भरण्यास मुदत देऊनही रक्कम जमा झाली नाही, अथवा चालविण्यास कुणी घेतला नाही, तर देणेकरी फार मोठा गोंधळ घालतील. नरसिंगराव पाटील जर १०० टक्के
हमी घेत असतील, तर आम्ही जरूर प्रयत्न करू.एवढे करूनही रक्कम भरली नाही, तर याला जबाबदार कोण?
भरमू पाटील म्हणाले, चंदगड तालुक्यात पिकणाऱ्या काजूवर गडहिंग्लज बाजार समितीतर्फे तालुक्यातच शीतगृहे उभारून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्यांच्या शेतमालाला चांगला भाव द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना जादा दर व योग्य वजन देण्यासाठी प्रयत्नशील असून, शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय उभे करण्यास आपण तत्पर आहोत. तुर्केवाडी येथील बाजार समितीच्या आवारात शीतगृहे उभी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मल्लिकार्जुन मुगेरी, तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर, नामदेव दळवी, प्रकाश चव्हाण, अशोक चराटी, उपसभापती शांताराम पाटील, तुकाराम बेनके, अनिल सुरूतकर, बंडू चव्हाण, भीमराव चिमणे, तानाजी गडकरी, अभय देसाई, कागल तालुका संघाचे अध्यक्ष अरुण भोसले, चंद्रकला बामुचे, किरण कांबळे, नारायण बांदिवडेकर, विश्वनाथ करंबळी, सारिका चौगुले, आदींसह कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते. उदयकुमार देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. आर. जी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘दौलत’ कुणी बुडवला त्यांना विचारा...
मुश्रीफ भाषण करण्यास उभे राहताच तालुका संघाचे संचालक जानबा चौगुले यांनी तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मते मागायला येताय. ‘दौलत’ सुरू करण्यासंदर्भात काय केलात ते सांगा, अशी विचारणा करताच मुश्रीफ यांनी ‘दौलत’वर राजकारणासाठी जेवणावळी, मटन खाल्ली. त्यावेळी तुम्ही राजकारण करणाऱ्यांना विचारल नाही. ‘दौलत’ काय आम्ही बुडविला नाही. ‘दौलत’ ज्यांनी बुडविला त्यांना विचारलं नाही, असे सांगून ‘राष्ट्रवादी’च्या संध्यादेवी कुपेकर यांना विधानसभा निवडणुकीत किती मते दिली ते सांगा, असा सवाल केला.