गणनेद्वारे दुर्मीळ वृक्षांचे होणार संगोपन
By Admin | Updated: February 20, 2015 23:15 IST2015-02-20T21:31:24+5:302015-02-20T23:15:08+5:30
इचलकरंजी शहर परिसर : जीपीएसद्वारे होणार वृक्षगणना

गणनेद्वारे दुर्मीळ वृक्षांचे होणार संगोपन
इचलकरंजी : इचलकरंजी शहर हद्दीतील वृक्षांची गणना जीपीएसद्वारे करण्याचा निर्णय नगरपालिका घेत असून, त्याद्वारे दुर्मीळ वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वृक्ष गणनेमध्ये चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या वृक्षांचा समावेश होणार आहे.नगरपालिकेच्या हद्दीत सात वर्षांपूर्वी झालेल्या वृक्ष गणनेत सार्वजनिक जागांमध्ये अठरा हजार वृक्ष आढळून आले होते. त्या वृक्षांमध्ये ६१ प्रकार मिळाले होते. त्यापैकी १८ प्रकारचे वृक्ष विविध फळांचे आहेत. साधारणत: १०० वर्षांपूर्वीची काही झाडे ९० फूट उंचीपर्यंत वाढलेली माहिती मिळाली होती. तसेच काही वृक्षांवर वेलीही आहेत.जीपीएसद्वारे वृक्षगणना केल्यामुळे दुर्मीळ असलेल्या झाडांचा शोध लागणार आहे. हे वृक्ष असलेली ठिकाणे लक्षात आल्यानंतर त्यांचे संगोपन करणे सुलभ होणार आहे. त्याचबरोबर अशा वृक्षांच्या रोपांची अधिक लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचा विचार नगरपालिकेचा आहे. नगरपालिकेने वृक्ष संपदा मोजण्यासाठी विशेष निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्याचे निश्चित केले आहे. वृक्ष गणना होताच अशा वृक्षांची जातकुळी, त्याची दुर्मीळता, त्याचे नेमके ठिकाण याबाबतची समग्र माहिती संगणकामध्ये नोंदविण्यात येणार आहे. वृक्षांची अनधिकृत तोड झाल्यास किंवा त्यांच्या फांद्यांची कत्तल करण्यात आली असता ते ताबडतोब लक्षात आल्यामुळे विनापरवाना वृक्ष व फांद्यांच्या तोडण्याला आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)
तरू समितीचे दुर्लक्ष
शहरातील वृक्षसंपदा ही जमिनीतील पाण्याच्या स्तराची वृद्धी करून त्याचे संवर्धन करतो, असे असतानाही नगरपालिकेतील तरू समिती शहरात विविध ठिकाणी असलेल्या लहान-मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यास हरकत नसल्याची शिफारस करते ; पण तरू समितीने शहराच्या हद्दीत नवीन वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संगोपनाचे काम केले पाहिजे. त्याचबरोबर वृक्षांची विनापरवाना कत्तल करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना पालिकेने त्यानुसार कधीही कोणावर कारवाई केल्याचे ऐकीवात नाही, अशी नागरिकांत चर्चा आहे.