घोरपडे कारखान्याच्या गळीत हंगामास मनाई कायम

By Admin | Updated: November 21, 2014 00:53 IST2014-11-21T00:51:46+5:302014-11-21T00:53:37+5:30

पुढील सुनावणी बुधवारी : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिज्ञापत्र दाखल नाही

The crushing season of the Gorpade factory has been blocked | घोरपडे कारखान्याच्या गळीत हंगामास मनाई कायम

घोरपडे कारखान्याच्या गळीत हंगामास मनाई कायम

म्हाकवे : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे प्रा.लि. या साखर कारखान्यास गळीत हंगाम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला मनाई आदेश कायम ठेवला आहे. पुढील सुनावणी बुधवारी
(दि. २६) होणार आहे.
घोरपडे साखर कारखान्याच्या विरोधात दाखल केलेल्या जनसुनावणीवर आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कारखान्याचे वकील जहांगीरदार यांनी कारखान्याने हंगाम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय मान्यता घेतल्या आहेत. त्यामुळे मनाई आदेश उठवून हंगाम सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली.
परंतु याचिकाकर्ते कृष्णात धामणकर व इतर तीन याचिकेच्या बाबतीत युक्तिवाद करताना अ‍ॅड. विजयसिंह थोरात यांनी चिकोत्रा धरण हे परिसरातील गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी व शेतीसाठी बारमाही पाणीपुरवठा व्हावा यासाठी बांधले आहे. उद्योगधंद्यासाठी पाण्याची तरतूदच नाही. तरीसुद्धा या कारखान्याची उभारणी चिकोत्रा तिरावर केवळ एक कि.मी. अंतरावर झाली आहे. तसेच या कारखान्यामुळे चिकोत्रा नदीच्या काठावरील सुमारे २० ते २५ गावांतील लोकांना पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे. हा कारखाना डोंगर पठारावर असल्याने त्यामुळे प्रदूषणात भरच पडणार आहे.
त्याचबरोबर बेलेवाडी येथील उभारणी झालेल्या ४६६ गट नंबरची मालकी कारखान्याची नसून यामध्ये हिस्सेदार मारुती पाटील व इतरही हिस्सेदारांचा समावेश आहे. तसेच बरीच कामे बेकायदेशीर व प्रदूषणाबाबत घेतलेल्या अनेक परवानग्या या बेकायदेशीर असल्याचे मंडलिक कारखान्याच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिज्ञापत्र दाखल न झाल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला करण्याचे आदेश देत कारखान्याच्या गळीत हंगामाला मनाई कायम ठेवली आहे.

तारीख पे तारीख ‘संभ्रम’
गेल्या दोन महिन्यांपासून घोरपडे कारखान्याविरोधात दाखल झालेल्या सुनावणीसंदर्भात अंतरिम निर्णय न होता तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे या कारखान्याचा गळीत हंगाम लांबणीवर पडत आहे. या कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन झाल्यामुळे दररोज कारखान्याचा लाखो रुपयांचा तोटा होत आहे. तसेच शेतकरी, ऊसतोड, वाहतूकदार, कर्मचाऱ्यांतही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Web Title: The crushing season of the Gorpade factory has been blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.