खचलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला

By Admin | Updated: May 30, 2015 00:07 IST2015-05-30T00:02:05+5:302015-05-30T00:07:24+5:30

नागरिकांचा रास्ता रोको : टोल विरोधी समितीचाही सहभाग : वाहनधारकांना तात्पुरता दिलासा; आंदोलनामुळे वाहतुकीचा बोजवारा

Crushed road open for traffic | खचलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला

खचलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला

फुलेवाडी : रंकाळा चौपाटीसमोरील डी-मार्टच्या जवळचा रस्ता गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खचलेल्या स्वरुपात आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करून वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी रंकाळा चौपाटीसमोर रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनात टोलविरोधी कृती समितीही पूर्ण ताकदीनिशी उतरली. सकाळी अकरा वाजल्यांपासून तासभर आंदोलन सुरू होते. आंदोलन संपताना आंदोलकांनी लोखंडी बॅरिकेटस् एकेरी मार्गाच्या आडवे लावून खचलेल्या रस्त्यावरूनच वाहतूक सुरू केली. त्यामुळे काहीअंशी वाहनधारकांना दिलासा मिळाला. मात्र, आंदोलनामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
टोलविरोधी कृती समितीच्या आंदोलनातील सुरुवातीपासूनचा कळीचा मुद्दा ठरलेला व आयआरबीच्या निकृष्ट कामाची साक्ष असलेला रंकाळ्यासमोरील
डी-मार्टसमोरील खचलेला रस्ता. हा रस्ता खचून तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही आयआरबीने हा रस्ता दुरूस्त केलेला नाही. खचलेल्या रस्त्यामुळे डी-मार्टसमोर एकेरी वाहतूक सुरू आहे. रंकाळ्याला भेट देणारे पर्यटक वाहने एकेरी मार्गावरच उभी करतात. पार्किंग व एकेरी वाहतुकीमुळे रोज हमखास वाहतुकीची कोंडी, छोटे-मोठे अपघात होतात.
आंदोलनावेळी राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांपासून करवीरच्या पश्चिम भागातील जनता हा त्रास सहन करीत आहे. एखादा रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचू शकत नाही, की वेळेवर समारंभाला जाता येत नाही. पर्यटकांच्या वाहनांचे पार्किंग, डी-मार्टचे पार्किंग रस्त्यातच असते. त्यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. हा रस्ता त्वरित दुरूस्त करून वाहतूक एकेरी करावी.
निवासराव साळुंखे म्हणाले, मूल्यांकनानंतर आयआरबीचा खरा काळा चेहरा जनतेसमोर येईल. जर ३१ मे रोजी राज्यातील अधिसूचनेत कोल्हापूरचे नाव नसले तरी चालेल; पण मूल्यांकनानंतर पूर्ण टोलमुक्तीच आम्हाला हवी आहे.
कॉ. चंद्रकांत यादव यांनी जनतेचा जीव धोक्यात आहे, याकडे सुस्त प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचा रास्ता रोको असल्याचे स्पष्ट केले.
महानगरपालिकेचे अधिकारी, आयआरबीचे अधिकारी आंदोलनस्थळी आल्याशिवाय रास्ता रोको मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी पोलिसांना स्पष्ट केले. त्यानुसार महानगरपालिकेचे अभियंता एस. के. पाटील आंदोलनस्थळी आले. त्यांचे म्हणणे आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या बँक गॅरंटीत हा रस्ता व जावळाचा गणपती ते तलवार चौक रस्ता अद्याप का केला जात नाही, यात काय गौडबंगाल आहे, याचा जाब विचारला. पाटील यांनी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी डी-मार्टसमोरील वाहने त्वरित हटवायला लावून डी-मार्ट बंद करण्यास भाग पाडले. काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
जोपर्यंत रस्ता सुरळीत होत नाही, तोपर्यंत डी-मार्ट बंद करण्याचीही ताकीद आंदोलकांनी डी-मार्ट प्रशासनास दिली. यानंतर आंदोलकांनी लोखंडी दुभाजकांनी एकेरी मार्ग बंद करून खचलेल्या मार्गावरूनच दुहेरी वाहतूक सुरू केली. या आंदोलनात कॉ. दिलीप पवार, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, दिलीप देसाई, रामभाऊ चव्हाण, सुभाष कोळी, सरदार सावंत, योगेश पाटील, रजत सूर्यवंशी, अभिजित सूर्यवंशी, सुमित डोर्ले, संदीप देसाई, गौरव लांडगे, किसन कल्याणकर,लाल
ेरे, आत्माराम जाधव, बाळासाहेब तळेकर, यांच्यासह नागरिक, वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)



डी-मार्टसमोरील रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यासाठी आम्ही याआधीच महानगरपालिका व वाहतूक नियंत्रण शाखेस पत्र दिले आहे. हा रस्ता नो-पार्किंग करणेबाबत आम्हीसुद्धा आंदोलकांच्या सोबत आहोत. आमचे दोनमजली प्रशस्त पार्किंग आहे. मात्र, ग्राहक व नागरिकच सांगूनही रस्त्यातच वाहने उभी करतात.- लक्ष्मण शिंदे, सिनिअर आॅफिसर (डी-मार्ट)


जावळाचा गणपती व रंकाळा चौपाटी याठिकाणी प्रत्येक शनिवारी व रविवारी सायंकाळी हमखास वाहतुकीची कोंडी होते.
यासाठी पर्यटकांना योग्य पार्किंग सुविधा, ट्रॅफिक पोलिसाची नेमणूक तसेच नो-पार्किंग झोन, अशी उपाययोजना अत्यंत आवश्यक बनली आहे.

Web Title: Crushed road open for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.