तोंडात अडकलेला गळ काढून वाचविले मगरीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:50 IST2018-10-24T00:50:08+5:302018-10-24T00:50:11+5:30
कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी हौशी मच्छिमारांनी टाकलेला गळ मगरीच्या घशात अडकला. त्या मगरीवर कोल्हापुरातील डॉ. गिरीश कुलकर्णी ...

तोंडात अडकलेला गळ काढून वाचविले मगरीचे प्राण
कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी हौशी मच्छिमारांनी टाकलेला गळ मगरीच्या घशात अडकला. त्या मगरीवर कोल्हापुरातील डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी यशस्वी उपचार करून त्या मगरीचे प्राण वाचविले.
कृष्णा नदीच्या पात्रात काही हौशी मच्छिमारांनी मासेमारीसाठी मोठे लोखंडी गळ टाकले होते. त्यात माशांऐवजी चक्क चार फुटी मगरच गळाला लागली. भीतीपोटी तेथेच गळ आणि दोरा टाकून ते युवक पळून गेले. ही बाब शेडशाळ (ता. शिरोळ) येथील शरद पवार या युवकाने पाहिली व वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावर वाईल्डचे देवेंद्र भोसले, आशुतोष सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष कृष्णा नदीकडे प्रयाण केले. तेथे पोहोचल्यावर मगरीच्या घशात हा गळ अडकला होता. तत्काळ ही बाब हातकणंगले येथील वन अधिकारी घनश्याम भोसले, सागर पोवार यांना फोनद्वारे कळविले. तेही तेथे दाखल झाले. मगरीची परिस्थिती पाहून तिला कोल्हापुरातील डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉ. कुलकर्णी यांनी मगरीवर तत्काळ वनअधिकाऱ्यांसमोरच उपचार केले.
काही तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर तिच्या घशातील गळ काढण्यात डॉक्टरांना यश आले. काही तासांच्या उपचारानंतर पुन्हा वनअधिकाºयांकडून कृष्णा
नदीच्या पात्रात मगरीला सोडण्यात आले.
मगरीला वाचविण्यासाठी
राहुल मंडलिक, सौरभ कोकाटे,
यश शिर्के, सावन कांबळे,
प्रमोद पाटील, अवधूत पाटील,
रोहित शिर्के या
कोल्हापुरातील युवकांचे योगदान लाभले.