विकेंड लॉकडाऊन नंतर जयसिंगपूर बाजारात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:06+5:302021-04-13T04:22:06+5:30
जयसिंगपूर : विकेंड लॉकडाऊन नंतर शहरात सोमवारी नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगमुळे ...

विकेंड लॉकडाऊन नंतर जयसिंगपूर बाजारात उसळली गर्दी
जयसिंगपूर : विकेंड लॉकडाऊन नंतर शहरात सोमवारी नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोना संचारबंदीचा फज्जा उडाला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शासनाने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. शनिवार व रविवारी या दोन दिवशी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. मात्र, सोमवारी शहरातील बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. विनामास्क फिरणाऱ्यांची ही संख्या मोठी होती. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम तोडून गर्दी झाली होती.
दरम्यान, पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीने काही नागरिक साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येत होते. झालेल्या या गर्दीमुळे विकेंड लॉकडाऊननंतर परिस्थिती जैसे थे च बनल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरेदीसाठी गर्दी, गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंग दिसूनच आले नाही. तर काही नागरिकांच्या तोंडाला मास्कच नव्हते. त्यामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र शहरात दिसत होते.
फोटो - १२०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील बाजारात सोमवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)