डेटॉल, मोठे ब्रश, ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी गर्दी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST2021-07-27T04:24:51+5:302021-07-27T04:24:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापूर ओसरू लागल्यानंतर आता घरा-घरात स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारी ब्लिचिंग ...

डेटॉल, मोठे ब्रश, ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी गर्दी;
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापूर ओसरू लागल्यानंतर आता घरा-घरात स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारी ब्लिचिंग पावडर, डिटर्जंट, फिनेल, ब्रश, वायपर खरेदीसाठी दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे. दुकानदारांनी देखील या वस्तू रास्त किमतीत विकण्यास सुरुवात केल्याने पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले दीड वर्ष मास्क आणि सॅनिटायझरसाठी गर्दी करणारे लोक सोमवारी घर स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य खरेदीत आघाडीवर दिसले.
महापुराने कोल्हापूर शहरासह गावांनाही आपल्या कवेत घेतले. मागील तीन दिवसांपासून घरे आणि सगळा संसारच पाण्यात आहे. दुकाने देखील पाण्यात आहेत. आता पाणी ओसरेल तसे घरे आणि दुकानांतील साहित्यावर गाळाचा थर साचलेला दिसत आहे. जे खराब झाले आहे, ते बाहेर कचरा म्हणून फेकून देण्याबरोबरच, जे चांगले आहे, त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. चांगले असलेले हे सर्व साहित्य बाहेर काढून स्वच्छता केली जात आहे, फरशा, भिंतीही साफ केल्या जात आहेत. या सर्वांसाठी फिनेल, डिटर्जंटची खरेदी वाढली आहे. शिवाय पाणी बाहेर चटकन काढता यावे म्हणून वायपर, ब्रश, खराटा यांची खरेदी केली जात आहे. शहरात अशा साहित्याची विक्री करणाऱ्या लक्ष्मीपुरीतील दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. पुराच्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटल्याने डेटॉल, फिनेल, ब्लिचिंग पावडर मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहे.
चौकट
शहरात पाणी आलेले नसल्याने पिण्याचे पाणी आणण्यासाठी २० लिटरच्या जारची गरज वाढली आहे. १५० ते २०० रुपयांना एक याप्रमाणे त्यांची विक्री सुरू आहे.
चौकट
पाण्याची घरगुती मोटार पाण्यात बुडाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी, विजेच्या उपकरणांच्या खरेदीसाठी लोक दुकानांवर गर्दी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी मोटार लावून बेसमेंटमधील पाणी बाहेर काढताना लोक दिसत होते.
दुकानातील साहित्याची स्वच्छता
लक्ष्मीपुरीत फर्निचरपासून प्लायवूड व तत्सम साहित्याची दुकाने जास्त आहेत. अचानक आलेल्या महापुरात त्यांचे नुकसान झाले आहे. बँका व अन्य कार्यालयांतील भिजलेली कागदपत्रे साफ करण्यापासून फर्निचर स्वच्छ करण्याचे काम दिवसभर सुरू राहिले.
(फोटो नसीर अत्तार देणार आहेत)