कोल्हापूर : दिवाळीच्या सुट्ट्या तसेच वीकेंडमुळे कोल्हापूर परिसरात भाविक, पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. देवदेवतांचे दर्शन, नैसर्गिक पर्यटन आणि खाद्य संस्कृतीने प्रसिद्ध असलेले सोयीचे डेस्टीनेशन म्हणून कोल्हापूरची ओळख सर्वदूर झाल्याने पर्यटकांचा ओढा प्रामुख्याने कोल्हापूरकडे असतो, त्याची प्रचिती गेल्या दोन-तीन दिवसांपासून येऊ लागली आहे.पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून भाविक, पर्यटक कोल्हापूरला येऊ लागले आहेत. अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीतील दत्त दर्शन तसेच ऐतिहासिक पन्हाळा गडावरील पर्यटनाबरोबरच दाजीपूर जंगल सफर असा भाविक-पर्यटकांचे बेत पाहायला मिळत आहे.शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात बाहेर गावाहून आलेल्या भाविक, पर्यटकांनी शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली. अंबाबाई मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी परिसरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवला. पार्किंगच्या जागाही वाहनांनी फुल्ल झाल्या होत्या. पर्यटकांच्या गर्दीमुळे शहरातील हॉटेल्स, खानावळी, रेस्टॉरंट, यात्रीनिवास मालकांची खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली आहे. काही यात्रीनिवास मालकांनी रूमचे जादा दर लावले असल्याचे सांगण्यात आले.अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली. देवस्थान समितीने उभा केलेला तात्पुरात दर्शन मंडप रांगेमुळे फुल्ल होऊन ही रांग भवानी मंडपापर्यंत आल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळपर्यंत ही गर्दी कायम होती. मंदिर परिसरातील हॉटेलमध्ये जेवण, नाश्त्याचाही भाविक आनंद घेताना दिसत होते.कोल्हापुरातील न्यू पॅलेस तसेच कणेरीमठ येथील ग्रामीण जीवनावर आधारित संस्कृतीचे दर्शन पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांच्या दृष्टीने आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आजपासून वन विभागाकडून दाजीपूर जंगल सफारी सुरू करण्यात आली. पावसाळ्यात ही जंगल सफारी बंद होती.
Web Summary : Kolhapur sees a surge in tourists and devotees during Diwali and the weekend. Attractions include the Ambabai temple, Jyotiba, and Panhala fort. Hotels and restaurants are thriving, and the Dajipur jungle safari has reopened.
Web Summary : दिवाली और वीकेंड के दौरान कोल्हापुर में पर्यटकों और श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ी। अंबाबाई मंदिर, ज्योतिबा और पन्हाला किला आकर्षण के केंद्र हैं। होटल और रेस्तरां फलफूल रहे हैं, और दाजीपुर जंगल सफारी फिर से खुल गई है।