पीक विम्याचे भरले पाच लाख, मिळाले २१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST2021-05-25T04:27:00+5:302021-05-25T04:27:00+5:30

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उंबरठा उत्पन्नामुळे कायमच मदतीच्या कक्षेबाहेर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र मागील ...

Crop insurance paid Rs 5 lakh, received Rs 21 lakh | पीक विम्याचे भरले पाच लाख, मिळाले २१ लाख

पीक विम्याचे भरले पाच लाख, मिळाले २१ लाख

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उंबरठा उत्पन्नामुळे कायमच मदतीच्या कक्षेबाहेर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र मागील खरीप हंगामात लॉटरीच लागली. भरलेल्या विम्याच्या रकमेपैकी चौपट रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळाली; पण यात शेतकऱ्यांची संख्या मात्र अवघी साडेसात टक्के आहे. तब्बल ९३ टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

मुळातच कोल्हापूरचे सरासरी उत्पन्न जास्त असल्यामुळे पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत धरलेच जात नाही. मात्र, त्यासाठी गेले वर्ष अपवाद ठरले. महापूर आणि परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे खरिपाचे प्रचंड नुकसान झाल्याने कधी नव्हे ते विम्याचे निकष लागू झाले. लाभ मिळत नसल्याने नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली; पण ६३४ हेक्टरवरील २ हजार ७७२ शेतकऱ्यांनी लागली लाॅटरी ठीक, नाही तर वाया गेले म्हणून पैसे भरले. नाममात्र हप्ता असल्यामुळे त्यांची ही रक्कम ५ लाख ३९ हजार १०६ इतकी झाली.

सरकारने ब्रोकर कंपनी म्हणून नेमलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ही रक्कम भरून घेतली.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात आपत्ती या दोन वर्गवारीमध्ये हप्ते भरले गेले. त्यांना दोन कोटी ६९ लाख ५५ हजार ४९८ रुपयांचे विम्याचे संरक्षण निश्चित केले गेले. प्रत्यक्षात यातील २१ लाख ३६ हजारांची विमा नुकसानीची रक्कम खरीप हंगामात २१० शेतकऱ्यांना अदा करण्यात आली. पाच लाख रुपये भरले असताना २१ लाखांची विम्याची रक्कम परतावा मिळण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

१) पॉईंटर्स

खरीप २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र - २ लाख ४३ हजार हेक्टर

२) एकूण मंजूर पीकविमा : २१ लाख ३६ हजार

शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ५ लाख ३९ हजार १०६

३) विमा काढणारे शेतकरी - २७७२

लाभार्थी शेतकरी - २१०

आतापर्यंत यांना मिळाला विमा - २१०

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - २१ लाख ३६ हजार

४) दोन हजार ५६२ शेतकरी बाद पीक विम्यासाठी २७७२ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी २१० जणांना लाभ मिळाला. ५८७ जणांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले. ८३३ जणांनी क्लेम मागितला होता, तर इतर त्रुटीसह एकूण २ हजार ५६२ शेतकरी या योजनेतून बाद केले गेले.

५) तक्ता

आपत्ती पात्र रक्कम दिलेले न दिलेले एकूण रक्कम

नैसर्गिक २२१ १३६ ३६ १२ लाख

काढणीपश्चात ३४ ३४ ०० ९ लाख ३६ हजार

चौकट

पीक विम्यात अंतर्भाव असलेली पिके व विमा हप्ता (प्रती हेक्टरी)

पीक विमा हप्ता

गहू ५७०

ज्वारी ४२०

हरभरा ५२५

भुईमूग ४५७

प्रतिक्रिया

आपत्ती सांगून येत नाही म्हणून पीक विम्याचा हप्ता भरतो; पण दरवेळी निकष आडवे येतात आणि लाभापासून वंचित राहावे लागते. पीक विम्याचे निकष बदलले तरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अन्यथा ही योजना म्हणजे विमा कंपन्यांचा नफा वाढवणारीच ठरणार आहे. भुईमुगासाठी विमा हप्ता भरला होता; पण कंपनीकडून वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचा माझा अनुभव आहे.

विशाल चौगुले, अकिवाट (ता. शिरोळ)

जिल्ह्यात उसाचे पीक जास्त आहे. महापूर आणि अवकाळी पावसामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. खरंच शासनाला शेतकऱ्यांचे भले व्हावे असे वाटत असेल तर उसाचा समावेश विम्यात करण्याची गरज आहे.

सागर शंभूशेटे,

नांदणी (ता. शिरोळ)

Web Title: Crop insurance paid Rs 5 lakh, received Rs 21 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.