सत्ता हाच जागावाटपाचा निकष : विनोद तावडे
By Admin | Updated: August 4, 2014 00:23 IST2014-08-04T00:14:11+5:302014-08-04T00:23:34+5:30
मराठा आरक्षण न्यायिक स्तरावर टिकणार नाही

सत्ता हाच जागावाटपाचा निकष : विनोद तावडे
कोल्हापूर : राज्यातील सत्ता मिळविणे हाच महायुतीमध्ये जागावाटपाचा निकष असेल. याच मुद्द्याला धरून मित्रपक्षांसोबत उपसमित्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पक्षीय ताकद पाहूनच मित्रपक्षांना जागा सोडली जाईल, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले. मराठा आरक्षणाची सत्ताधाऱ्यांनी घाई केली असून, न्यायिक स्तरावर ते टिकणार नाही; मात्र राज्यात सत्तापालट होताच, आरक्षण सक्षमपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली.तावडे म्हणाले, शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी गेल्या अनेक निवडणुकांत दहा हजारांचाही टप्पा ओलांडलेला नाही, अशा ३० ते ३५ जागांबाबतच बाहेरील उमेदवारांबाबत निर्णय होऊ शकतो. जनतेत स्थान असणाऱ्या, भ्रष्टाचार व अकार्यक्षमता यांपासून लांब असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे भाजपमध्ये स्वागत आहे. राज्यभर ९ ते १५आॅगस्टदरम्यान ‘खुर्ची हटाव’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
सत्ता आल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य शासनाने राबविलेल्या सर्व लोकहिताच्या योजनांचा फेरआढावा घेतला जाईल. सर्व घोटाळ्यांची कालबद्ध चौकशी केली जाईल. सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. मात्र, तोपर्यंत सीमाभागातील जनतेवर जोर व बळाचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. भविष्यात सीमाप्रश्नी शिवसेनेने भाजपला सोबत घेऊनच आंदोलन करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. (प्रतिनिधी)
मराठा आरक्षणाची घाईराणे समितीने सर्वंकष अभ्यास न करताच २० टक्के मराठा आरक्षणाची घाई केली. यामध्येही मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण घुसडले.न्यायिक स्तरावर हे आरक्षण टिकणार नाही. भाजप राज्यात सत्तेवर येताच अधिक सक्षमपणे आरक्षणाची प्रक्रिया राबवील.
- विनोद तावडे (विरोधी पक्षनेता)