अपंग-अव्यंग विवाहास चालना मिळणार
By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-21T00:15:00+5:302014-07-21T00:24:18+5:30
अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी : संसारोपयोगी साहित्यासह खर्चासाठी ५० हजार रुपये

अपंग-अव्यंग विवाहास चालना मिळणार
महेश आठल्ये - म्हासुर्ली
अपंग व्यक्तीशी अपंग नसणाऱ्या व्यक्तींनी विवाह करावा यासाठी प्रोत्साहन म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अर्थसाहाय्य देण्याची योजना आखली आहे. आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर प्रोत्साहन देण्यासाठी अपंग व अव्यंग जोडप्याने विवाह केल्यास रोख रक्कम, बचत प्रमाणपत्र, संसारोपयोगी साहित्य व स्वागत समारंभ असे एकूण ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंग नसलेल्या सदृढ व्यक्तीने विवाह केल्यासच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे तसेच विवाहास आर्थिक मदत व्हावी यादृष्टीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ज्या पद्धतीने आर्थिक साहाय्य दिले जाते त्याप्रमाणे अपंग व अपंगत्व नसलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अपंग व अव्यंग विवाहास चालना मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ४०टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असलेल्या वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू-वराशी विवाह केल्यास अर्थसाहाय्य केले जाणार असून त्यामध्ये २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, रोख रक्कम २० हजार रुपये, संसारोपयोगी साहित्यासाठी ४५०० रुपये, तर स्वागत समारंभासाठी ५०० रुपये असे एकूण ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या वधू अथवा वराने अपंगत्वाचे सक्षम अधिकाऱ्याने (सक्षम व्यक्तीने) दिलेले प्रमाणपत्र असावे. दोघांपैकी एकजण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वर अथवा वधूचा प्रथम विवाह असावा. घटस्फोटित असल्यास पूर्वी मदत घेतलेली नसावी.