खरमाटेंसह कर्मचाऱ्यांवर फौजदारी करा
By Admin | Updated: July 11, 2017 00:47 IST2017-07-11T00:47:56+5:302017-07-11T00:47:56+5:30
खरमाटेंसह कर्मचाऱ्यांवर फौजदारी करा

खरमाटेंसह कर्मचाऱ्यांवर फौजदारी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील शिंगणापूर, पाडळी खुर्द, बालिंगा, हसूर दुमाला, म्हालसवडे येथे बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश खरमाटेंसह ग्रामसेवक व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच मृत मतदारांची नावे यादीतून काढावीत, अशी मागणी सोमवारी आमदार चंद्रदीप नरके यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यात सध्या नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये करवीर मतदारसंघातील काही गावांमध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बालिंगा येथे ५८० बोगस मतदार आढळून आले. या मतदारांकडे स्थानिक ग्रामस्थांनी योग्य कागदपत्रांसाठी तगादा लावल्यावर काहीजणांनी मतदान न करता पळ काढला होता. या बोगस मतदारांच्या नावांची यादी निवडणूक विभागाकडे देऊनही आतापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. येथील ग्रामसेवकांनी बोगस दाखला व बोगस ओळखपत्रे देऊन नोंदणी करण्यास हातभार लावला होता, असे नरके म्हणाले.
म्हालसवडेतील काही मतदारांची नावे ही हसूर दुमालाच्या मतदारयादीत नोंद करण्यात आली आहेत, तर हसूरमधील नावे ही म्हालसवडे गावात नोंद केली आहेत. याबाबत संबंधित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली. असे असूनही त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. खरमाटे यांच्यासह संबंधित ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून खऱ्या सूत्रधाराला समोर आणा, अशी मागणी नरके यांनी केली. यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) रवींद्र खाडे, दादासो लाड, किशोर पाटील, संजय पाटील, विलास पाटील, आनंदा पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे, आदी उपस्थित होते.
शिंगणापूरमध्ये डाटा आॅपरेटर्सचा प्रताप
शिंगणापूर गावात तेथील मतदार नोंदणीसाठी नेमलेल्या डाटा आॅपरेटर्सनीच मनमानी पद्धतीने बोगस नावे घुसडली. नक्कीच याच्यामागे कोणी तरी आहे? याचा शोध प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी आ. नरके यांनी केली.
चावडी वाचन करून नावे कमी करा
बोगस झालेली मतदार नोंदणीतील नावे जिल्हा प्रशासनाने चावडी वाचन करून कमी करावीत, असे आमदार नरके यांनी सांगितले.