अतिरिक्त पैसे घेणाऱ्या डॉक्टरांवर फौजदारी करा
By Admin | Updated: December 19, 2014 00:13 IST2014-12-18T23:50:58+5:302014-12-19T00:13:21+5:30
जनशक्ती संघटना : जीवनदायी योजनेच्या समन्वयकांकडे मागणी

अतिरिक्त पैसे घेणाऱ्या डॉक्टरांवर फौजदारी करा
कोल्हापूर : शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून फेरतपासणी व अन्य तपासण्यांच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या डॉक्टारांवर फौजदारी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जनशक्ती संघटनेच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांना आज, गुरुवारी सीपीआर रुग्णालयात धारेवर धरले होते.
या योजनेची माहिती सर्वसामान्य रुग्णांना दिली जात नाही. त्याचबरोबर ज्या २८ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना लागू केली आहे, त्या ठिकाणी रुग्णांची अर्थिक पिळवणूक केली जात आहे. या योजनेंतर्गत ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया व १२१ प्रकारच्या फेरतपासण्या पूर्णपणे मोफत आहेत. मात्र, रुग्णांकडून नियमबाह्यरीत्या आगाऊ व अतिरिक्त पैसे भरून घेतले जाते आहेत. अशा रुग्णालयांवर आणि डॉक्टारांवर जिल्हा समन्वयक म्हणून कारवाई करा, अशी मागणी जनशक्तीच्यावतीने करण्यात आली. याबाबत बोलताना डॉ. देठे यांनी, तुम्ही या डॉक्टरांविरोधात जर पुरावा देत असाल, तर फौजदारी गुन्हे दाखल करू व ज्या दवाखान्यांबाबत तक्रार असेल तर त्या दवाखान्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जनशक्तीचे समीर नदाफ, रियाज कागदी, राजन पाटील, नसीर गवंडी, तय्यब मोमीन, राजेश माने, मालोजी केरकर, आदी उपस्थित होते.
——————-