लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिका सर्व आस्थापनांसह व्यापारी व भाजी विक्रेत्यांसाठी लसीकरण शिबिर भरवले आहेत. यात लसीकरण करून घ्यावे, अन्यथा परवाना रद्दसह फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी अग्निशमन विभागप्रमुख, परवाना अधीक्षक, इस्टेट ऑफिसर, अतिक्रमण विभागप्रमुख व मार्केट इन्स्पेक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत प्रशासक बलकवडे यांनी ‘प्रथमत: सर्वाना या आदेशानुसार प्रबोधन करावे व लसीकरणासाठी कालावधी द्यावा, असेही सांगितले
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई होणार आहे. ४५ वर्षांवरील सर्वांसाठी एकाच ठिकाणी विशेष कॅम्प घेऊन महापालिकेने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी याबाबत लस घेणाऱ्यांची यादी तयार करून महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व या विशेष कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालयाकडून ११ ऑगस्ट २०२१ च्या आदेशाने काही व्यवसाय व आस्थापना यांना रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने उपाहारगृहे, सर्व प्रकारची दुकाने, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, योगा, सलून, स्पा, इनडोअर्स स्पोर्ट्स तसेच सर्व प्रकारची कार्यालये, औद्योगिक सेवाविषयक आस्थापना मैदाने, उद्याने, चौपाट्या व विवाह सोहळे यासंबंधी अटी-शर्ती घालून परवानगी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने लसीकरण करणे बंधनकारक आहे. यामध्ये दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र व त्याला चौदा दिवस पूर्ण झाल्याची खात्री करणे व अन्य नियमांचे पालन अत्यावश्यक आहे, असेही सांगितले.