महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी १०३ जणांविरुद्ध फौजदारी, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र : दोन ते दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:34+5:302021-07-01T04:17:34+5:30
कोल्हापूर : आर्थिक संकटात असलेल्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजबिल वसुलीचे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण ...

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी १०३ जणांविरुद्ध फौजदारी, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र : दोन ते दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद
कोल्हापूर : आर्थिक संकटात असलेल्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजबिल वसुलीचे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांची तोडफोड केल्याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच महिन्यांमध्ये १०३ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ६५ जणांना तत्काळ अटक करण्यात आली आहे.
पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरवड्यात शासकीय कामात अडथळा आणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या दहा घटना घडल्या असून २१ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर त्यातील अकरा जणांना अटक करण्यात आली. वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे थकीत वीजबिलांच्या वसुली मोहीम राबवित आहेत. मात्र थकीत वीजबिलांचा भरणा करण्याऐवजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार होत आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली आहे.
वीजग्राहकांच्या २४ तास सेवेत असणाऱ्या तसेच शासकीय कर्तव्य बजावताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार झाल्यास तत्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रोजच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना वीजबिल वसुलीदरम्यान मारहाण किंवा कार्यालयातील धुडगूससारख्या दुर्दैवी प्रकारांना सामोरे जावे लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.