कर्णकर्कश ध्वनीक्षेपकावर गोंधळ माजवणाऱ्या नऊ कार्यकर्त्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:40+5:302021-08-20T04:28:40+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधित आदेश दिले असतानाही मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कर्णकर्कश ध्वनीक्षेपक लावून, सोशल डिस्टन्सिंगचा ...

कर्णकर्कश ध्वनीक्षेपकावर गोंधळ माजवणाऱ्या नऊ कार्यकर्त्यांवर गुन्हे
कोल्हापूर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधित आदेश दिले असतानाही मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कर्णकर्कश ध्वनीक्षेपक लावून, सोशल डिस्टन्सिंगचा भंग करुन एकत्रित गोंधळ घातल्याप्रकरणी शिवाजी पेठेतील प्रसाद तरुण मंडळाच्या नऊ कार्यकर्त्यांवर पोलिसात गुन्हे नोंदवले आहेत. हा प्रकार बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. या कारवाईत जुना राजवाडा पोलिसांनी ध्वनीक्षेपक व विजेचे सुमारे तीन लाखांचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी अमोल अजित माने (वय २९), अमित रवींद्र कुरणे (३३), आशिष राजेंद्र कुरणे (३३ सर्व रा. शिवाजी पेठ), परेश तुषार बनगे (२७, रा. राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंद), सिध्दार्थ प्रताप कांबळे (२७, रा. शुक्रवार पेठ), साईराज संतोष सूर्यवंशी (२२, रा. शिंगणापूर, ता. करवीर), सुरज बाबासाहेब थोरात (३८), धीरज बाबासाहेब थोरात (३४, दोघेही रा. बालिंगा, ता. करवीर), ध्वनीक्षेपक मालक अवि पवार (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील कलमान्वये कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित आदेश असल्याबाबत शिवाजी पेठेत वेताळमाळ तालीमशेजारी प्रसाद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिली होती. तरीही त्या नोटीसकडे कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष करुन बुधवारी रात्री उशिरा पंजा बाहेर काढून कर्णकर्कश ध्वनीक्षेपक लावून गोंधळ केला. त्याबाबतचा फोन पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत ध्वनीक्षेपक बंद करण्यास भाग पाडले. यावेळी नियमांचा भंग करुन गोंधळ घालणाऱ्या नऊ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून शार्पी २ नग, हेज मशीन १ नग, वेलंडर लाईट ४ नग, बेस १ नग व टॉप १ नग, लाईट बोर्ड १ नग अशी सुमारे २ लाख ९६ हजार रुपये किंमतीची ध्वनीक्षेपक व वीज यंत्रणा जप्त केली. याबाबत पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव करत आहेत.