केरळमधील दागिने चोरीप्रकरणी पकडलेल्या जतच्या दोघांवर गुन्हा
By Admin | Updated: April 3, 2015 00:37 IST2015-04-03T00:10:48+5:302015-04-03T00:37:45+5:30
वैभववाडीत कारवाई : चोरीच्या मुद्देमालासह एकजण पसार

केरळमधील दागिने चोरीप्रकरणी पकडलेल्या जतच्या दोघांवर गुन्हा
वैभववाडी : वैभववाडी पोलिसांनी सराफाच्या माहितीवरून बुधवारी पकडलेले जतचे (जि. सांगली) संग्राम व शशिकांत सावंत हे दोघे संशयित तरुण अट्टल चोरटे निघाले. त्यांनी केरळमध्ये कामास असलेल्या सराफी दुकानात हात मारून ३१ लाख ८ हजार रुपये किमतीचे १२०० ग्रॅम सोने घेऊन ते पसार झाले होते. त्यानंतर चोरीचा बहुतांश मुद्देमाल घेऊन आरोपी शशिकांतचा मामा फरार आहे. आठ दिवसांपूर्वीच्या या गुन्ह्यात केरळमध्ये या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून सराफी दुकानमालक यशवंत भीमराव चव्हाण (मूळ गाव विटा, सांगली) यांनी या दोघांना गुरुवारी ओळखले.वैभववाडीातील सराफ आबा वाडेकर यांच्या ज्वेलर्समध्ये बुधवारी दुपारी सोन्याचे तुकडे विकण्यासाठी संग्राम सावंत (वय १९) व शशिकांत सावंत (२०, दोघे रा. जत, सांगली) गेले होते. वाडेकर यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. त्यामुळे दोघे दुकानातून निसटले. मात्र, पोलिसांनी वर्णनावरून त्यांना बसस्थानक परिसरात ताब्यात घेऊन चौकशी करताना त्यांच्याकडे १७ सीमकार्ड आढळल्यामुळे संशय बळावला होता. तसेच त्यांच्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यामुळे पोलिसांनी जत आणि केरळ येथे संपर्क साधला होता. (प्रतिनिधी)
मुद्देमालासह ‘मामा’ गायब
दुकानमालक यशवंत चव्हाण यांनी गुरुवारी वैभववाडी पोलीस ठाण्यात संग्राम आणि शशिकांतला ओळखले. मात्र, चोरलेल्या सोन्याविषयी ते दोघे सविस्तर माहिती देऊ शकले नाहीत. त्या सोन्यापैकी बहुतांश हिस्सा शशिकांतच्या मामाकडे असून, तो गायब असल्याचे दोघांनी स्पष्ट केले.
यशवंत चव्हाण केरळहून वैभववाडीत दाखल होण्याआधीच संग्राम सावंत व शशिकांत सावंत यांनी चोरीची कबुली पोलिसांकडे दिली. चव्हाण यांनी या दोघांना ओळखल्यानंतर सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले.
सराफी दुकानाचा मालक विट्याचा
विटा (जि. सांगली) येथील यशवंत भीमराव चव्हाण यांचा सराफ व्यवसाय असून, तो केरळमधील त्रिसूर येथे आहे. तेथे कामासाठी आपल्या भागातील कामगार असावेत म्हणून त्यांनी शशिकांत व संग्रामला केरळ येथे काही महिन्यांपूर्वी नेले होते. काही दिवस काम केल्यानंतर संग्राम व शशिकांतची मती फिरली आणि आठ दिवसांपूर्वी दुकानामध्येच ३१ लाख ८ हजार किमतीच्या १२०० ग्रॅम सोन्यावर डल्ला मारून पोबारा केला.