अतुल आंबीइचलकरंजी : लागोपाठ दोन खून, तसेच खुनीहल्ले वाढल्याने वस्त्रनगरी हादरली आहे. यातील बहुतांशी प्रकरणांत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाच समावेश आहे. त्याचबरोबर, अल्पवयीन मुलांचाही सहभाग लक्षणीय आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध आराखडा आखून या प्रकाराला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने जलदगतीने विस्तारलेल्या इचलकरंजी शहरात देशभरातील विविध राज्यांतून नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी अवैध व्यवसाय, वर्चस्ववाद या प्रकारांतून गुन्हेगारी वाढून वस्त्रनगरीची शस्त्रनगरी बनली होती. तत्कालीन पोलिस दलाने कठोर पावले उचलत टोळ्यांना मोक्क्यामध्ये अडकवले. त्यानंतर, आटोक्यात आलेली गुन्हेगारी हळूहळू पुन्हा वाढीस लागली आहे. याला वेळीच आळा न घातल्यास पुन्हा वस्त्रोद्योगात अशांततेचे वातावरण निर्माण होईल.येथील उद्योजक व्यवहारी दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. चांगल्या प्रतीचे उत्पादन असल्यामुळे येथील उत्पादनाला मोठी मागणी आहे. उद्योगनगरीच्या निमित्ताने बाहेरहून आलेल्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले अवैध व्यवसायाचे बस्तान बसविण्यासाठी तरुणाईला हाताशी धरून आपली दहशत निर्माण करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता आहे. गांजा, तसेच मद्यप्राशन याच्या आहारी गेलेल्या युवकांना ते मिळाल्याशिवाय चैन पडत नसून, त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होताना दिसत आहेत.याचाच गैरफायदा घेत काही व्हाइट कॉलर दादा अशा युवकांना हाताशी धरून आपले साम्राज्य पसरविण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला किरकोळ गुन्ह्यात खाकीचे सहकार्य मिळाल्यानेही या प्रकाराला खतपाणी मिळते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
हल्लेखोरांची पार्श्वभूमीदोन्ही खून, तसेच दोन्ही प्राणघातक हल्ले अशा चारही प्रकरणांतील बहुतांश हल्लेखोर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. प्रथमदर्शनी घरगुती वाद, प्रेमप्रकरण, किरकोळ वाद यातून हे प्रकार घडल्याचे दिसत असले, तरी संबंधित हल्लेखोर रेकॉर्डवरील असल्यानेच त्यांच्याकडून असे गंभीर प्रकार घडतात.बंदी फक्त कागदावरचगावठी दारू, गांजा, सिगारेट, मावा अशा नशेच्या मागे लागूनही तरुणाई बिघडत आहे. याला बंदी असताना शहरात सर्वत्र खुलेआम हे सर्व प्रकार सहजपणे मिळतात. त्यामुळे बंदी फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.