क्षीरसागर, मोरे यांच्यावर गुन्हा

By Admin | Updated: October 16, 2014 22:53 IST2014-10-16T22:33:27+5:302014-10-16T22:53:12+5:30

हाणामारी प्रकरण : क्षीरसागर यांच्यासह अन्य आरोपींना समन्स नोटीस

Crime against Kshirsagar, More | क्षीरसागर, मोरे यांच्यावर गुन्हा

क्षीरसागर, मोरे यांच्यावर गुन्हा

कोल्हापूर : निवडणुकीच्या वादातून आमदार राजेश क्षीरसागर व माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्यात झालेल्या हाणामारीप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून, संशयित आरोपींना समन्स नोटीस काढून न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालय येथील मतदान केंद्राच्या बूथवर आमदार क्षीरसागर व माजी नगरसेवक मोरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. हल्ल्यामध्ये तलवारी, लोखंडी गज व काठ्यांचा वापर करण्यात आला.
यामध्ये क्षीरसागर यांचा कार्यकर्ता अनिकेत अनिल पाटील, तर माजी नगरसेवक मोरे, त्यांचा मुलगा पृथ्वीराज मोरे, अमोल मोरे, ऋतुराज देसाई, संजय चव्हाण, बाबूराव वरणे, प्रशांत कुरणे हे जखमी झाले. या मारामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
या प्रकरणी मोरे यांनी संशयित आरोपी आमदार राजेश क्षीरसागर, त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर, स्वीय सहायक राहुल बंदोडे, उमेश रेळेकर, अजित राडे व इतर १५ जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. क्षीरसागर यांचे कार्यकर्ते उमेश सुभाष रेळेकर यांनी संशयित आरोपी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, त्यांचा मुलगा पृथ्वीराज मोरे, सुभाष बाळकृष्ण मोरे, संजय चव्हाण, अमोल सुभाष मोरे, सारंग सागर जाधव, ऋतुराज देसाई यांच्यासह १५ जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आज, गुरुवारी या दोन्ही गटांच्या सर्व संशयित आरोपींचे जाबजबाब घेतले.
आमदार क्षीरसागर यांचा अद्याप जबाब झालेला नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोन्ही गटांच्या आरोपींना समन्स नोटिसा काढून न्यायालयात हजर करणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against Kshirsagar, More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.