बालविवाहप्रकरणी मुला-मुलीच्या आई-वडिलांसह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST2021-06-17T04:18:13+5:302021-06-17T04:18:13+5:30
कोल्हापूर : संभाजीनगर परिसरात एका हॉलमध्ये बालविवाह होत असल्याची तक्रार जुना राजवाडा पोलिसांत दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने संबंधित ...

बालविवाहप्रकरणी मुला-मुलीच्या आई-वडिलांसह चौघांवर गुन्हा
कोल्हापूर : संभाजीनगर परिसरात एका हॉलमध्ये बालविवाह होत असल्याची तक्रार जुना राजवाडा पोलिसांत दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने संबंधित हॉलमध्ये जाऊन चौकशी केली असता अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे दिसून आले. त्यानुसार उपस्थित मुलीची आई, मुलाचे आई-वडील, भटजीसह चौघांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजीनगर येथील एका हॉलमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह समारंभ झाला. पोलिसांनी तक्रारीनुसार जाऊन चौकशी केली असता सोळा वर्षे एक महिना वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे आढळले. विवाहासाठी उपस्थित मुलीची आई, मुलाचे आई-वडील व भटजी यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा, कोविड उपायोजना कलमाप्रमाणे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास जाधव करीत आहेत. अल्पवयीन मुलीच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक करण्यात कायद्यामध्ये तरतूद आहे. तरी अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे माहिती मिळाल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केले आहे.