खासगी सावकारीप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 13, 2014 00:42 IST2014-07-13T00:40:59+5:302014-07-13T00:42:21+5:30
जमीन हडपली : सैनिक टाकळी येथील घटना

खासगी सावकारीप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
कुरुंदवाड : व्याजाने पैसे देऊन त्या बदल्यात जमीन हडप केल्याप्रकरणी सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील विश्वनाथ शंकर पाटील व वीरेंद्र विश्वनाथ पाटील या पिता-पुत्रांच्या खासगी सावकारीच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक तातोबा मगदूम (रा. टाकळी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
अशोक मगदूम यांनी आपल्या आर्थिक अडचणीच्यावेळी विश्वनाथ पाटील यांच्याकडून २००१ साली प्रतिमहिना पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये तीन वर्षांसाठी घेतले होते. त्या बदल्यात गट नं. ११२१ मधील एक एकर जमीन गहाण दिली होती. तीन वर्षांनंतर घेतलेल्या रकमेवर ५ लाख ४० हजार रुपये व्याजाची मागणी मगदूम यांनी पाटील यांच्याकडे केली. जमीन हडप करण्याच्या उद्देशाने पाटील पिता-पुत्रांनी मगदूम यास धमकावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी पाटील पिता-पुत्रांवर महाराष्ट्र सावकारी नियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके तपास करीत आहेत. (वार्ताहर)